कोल्हापूर विमानतळाला 223 कोटी मिळणार | पुढारी

कोल्हापूर विमानतळाला 223 कोटी मिळणार

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर विमानतळाचे काम प्राधान्याने पूर्ण केले जाणार आहे. यासाठी 223 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव असल्याचे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी मंगळवारी सांगितले. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने राज्यातील 87 प्रकल्पांबाबत मंगळवारी आढावा बैठक झाली. यावेळी कपूर यांनी ही माहिती दिली.

राज्यातील विमानतळ, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग आदी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयाशी संबंधित प्रकल्पांचा पंतप्रधान कार्यालयाने आढावा घेतला. सुमारे अडीच तास झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती यांच्यासह संबंधित विभागाचे प्रधान सचिव आणि राज्यातील 34 जिल्हाधिकारी उपस्थित होते.

वर्षभरात विस्तारीकरण पूर्ण

कोल्हापूर विमानतळाबाबत कपूर यांनी पंतप्रधान कार्यालयाला माहिती दिली. या विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. धावपट्टी विस्तारीकरणासाठी अतिरिक्‍त 64 एकर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून 223 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. कोल्हापूर विमानतळ कामाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार असून येत्या वर्षभरात विमानतळाच्या विस्तारीकरणाची सर्व कामे पूर्ण होतील, असेही ते म्हणाले.

या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत कोल्हापुरातून जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर सहभागी झाले होते. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामांनी गती घेतली आहे. राज्य शासनानेही कोल्हापूर विमानतळाला प्राधान्य दिल्याने येत्या काही महिन्यांत कोल्हापूर विमानतळाचा चेहरामोहराच बदलून जाणार आहे. विमानतळ विकासामुळे जिल्ह्याच्या विकासालाही चालना मिळणार आहे.

विमानतळ भूसंपादन प्रक्रियेला प्रारंभ

कोल्हापूर विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणासाठी आवश्यक 64 एकर जागेच्या भूसंपादनाला प्रारंभ झाला आहे. भूसंपादनासाठी आवश्यक जमीन, त्याचे नकाशे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ही सर्व जमीन जागा मालकांकडून थेट खरेदी करून घेतली जाणार आहे. याकरीता संमती पत्राच्या नोटिसाही काढण्यात आल्या आहेत.

मुडशिंगी आणि तामगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय तसेच करवीर तहसील आणि करवीर प्रांताधिकारी कार्यालयात हे नकाशे, संपादित केले जाणार्‍या जमिनीचे गट क्रमांकाची यादी पाहण्यासाठी बुधवारपासून उपलब्ध केली जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरही ही सर्व माहिती पाहता येणार आहे.

धावपट्टी विस्तारीकरणासाठी 64 एकर जागेची आवश्यकता आहे. त्यानुसार मौजे मुडशिंगी येथील 25 हेक्टर 49.94 आर इतकी तर तामगाव येथील 0.34 गुंठे 75 चौरस मीटर इतक्या जमिनीचे संपादन केेले जाणार आहे. मुडशिंगी येथील एकूण 12 सर्व्हे क्रमांक आहेत, त्यामध्ये 195 पोट हिस्से असून जागा मालकांची संख्या 1 हजार 59 इतकी आहे. तामगावात एकच सर्व्हे क्रमांक असून त्यात दोन पोट हिस्से आहेत.

त्यामध्ये 5 जागा मालक असे एकूण 1 हजार 64 जणांच्या मिळकती संपादित केल्या जाणार आहेत. संपादित केलेल्या जागेत दोन सरकारी गट असून त्याची 2 हेक्टर 82.50 आर इतकी जमीनही संपादित केली जाणार आहे. या गट क्रमांकातील काहींची राहती घरे, फ्लॉट, फार्म हाऊस, गोदाम, कारखाने, केळीच्या, नारळीच्या बागा आदीं संपादित होणार आहेत.

भूसंपादन प्रक्रियेला होणारा विलंब, त्याची प्रक्रिया याचा विचार करता ही सर्व जमीन थेट खरेदी करून घेतली जाणार आहे. याकरीता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने एजन्सीची नियुक्‍ती केली आहे. व्यवहार निश्‍चित झाल्यानंतर तत्काळ खरेदीपत्रे केली जाणार आहेत. ही सर्व प्रक्रिया दोन-तीन महिन्यात पूर्ण होईल, याद‍ृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

दरम्यान धावपट्टी विस्ताराचे काम सुरू असून सध्या 1970 मीटर पर्यंतचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जागेअभावी त्यापुढील काम ठप्प राहण्याची भीती होती. मात्र, संबंधित जागा मालकांकडून संमतीपत्र घेतले जाणार आहे. त्यामुळे धावपट्टी विस्ताराचे काम विनाखंड सुरूच राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

विमानतळ प्राधिकरणानेही धावपट्टी विस्ताराचे काम पुढे सुरूच ठेवण्याचे नियोजन केले आहे. यामुळे या वर्षाअखेरपर्यंत कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी 2300 मीटरची होईल. त्यावर बोईंग, एअर बस सारखी मोठी विमाने उतरण्याचा मार्ग मोकळा होईल.

Back to top button