सतेज पाटील : जयप्रभा स्टुडिओचे अस्तित्व कायम राखण्यासाठी शासनस्तरावर बैठक घेऊ | पुढारी

सतेज पाटील : जयप्रभा स्टुडिओचे अस्तित्व कायम राखण्यासाठी शासनस्तरावर बैठक घेऊ

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : जयप्रभा स्टुडिओचे अस्तित्व कायम राहावे, अशी कोल्हापूरकरांची मागणी आहे. संबंधित जागेची विक्री झाली आहे. शासनस्तरावर बैठक घेऊन जागा सरकार घेऊ शकते का, याबाबत निर्णय घेणे शक्य होईल, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

पाटील म्हणाले, लता मंगेशकर यांच्या स्मारकाबाबत ज्यावेळी बोललो, त्यावेळी जयप्रभा मालकीबाबत माहिती नव्हती. लता मंगेशकर यांची भेट कोरोनामुळे होऊ शकली नाही. पर्यायी जागा दिल्यास जयप्रभा स्टुडिओच्या जागेचे अस्तित्व कायम राखता येईल.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या विधानावर पालकमंत्री पाटील म्हणाले, मूळ मालकांकडून शासनस्तरावर लेखी प्रस्ताव आल्यानंतर त्याबद्दल चर्चा करून निर्णय घेता येईल. याबाबत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून बैठकीचे नियोजन करू. ‘जयप्रभा’बाबत राजकारण न करता झालेल्या व्यवहारावर चर्चा करण्यापेक्षा पुढे काय करायचे, याचा विचार करूया. हेरिटेज विषय असल्याने शासनस्तरावर त्याची किंमत ठरवून जागा ताब्यात घेऊन जयप्रभाचे अस्तित्व कायम ठेवता येते का? चित्रनगरीचा एक भाग जयप्रभा करता येईल का, याचा विचार करू.

मंत्री सतेज पाटील म्हणाले, जयप्रभा स्टुडीओ विक्री व्यवहारात मूळ मालक मंगेशकर कुटुंबीय असल्याने वादात पडणे संयुक्‍तिक वाटत नाही. लतादीदींच्या नावाने वाद करू, अशी भूमिका मंगेशकर कुटुंबीयांनी घेतली आहे. त्यामुळे त्या व्यवहाराच्या खोलात जाण्यापेक्षा पुढे काय करायचे, हे ठरविणे संयुक्‍तिक होईल.

ते म्हणाले, प्रत्येक व्यवस्थेत उणिवा असतात. महापालिकेतही असतील. थेट पाईपलाईनमुळे पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागेल. कोट्यवधी रुपयांतून रस्ते झाले आहे. कचरा उठावाचे नियोजन चांगले आहे. महापालिकेचे काम चांगले आहे. राजू शेट्टी यांच्या मनात गैरसमज आहेत. त्यांच्याबाबत माहिती घेतो. काही तांत्रिक अडचणी आहेत. सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला; मात्र शेतकर्‍यांच्या बाजूने राहण्याचा महाविकास आघाडीचा कायम प्रयत्न आहे.

लवकरच कोल्हापूर-सांगली लोकल

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सांगली-कोल्हापूर ही लोकल रेल्वेसेवा बंद आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने रेल्वेच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली आहे. कोल्हापूर-सांगली मार्गावर लोकल रेल्वे लवकर सुरू केली जाईल, अशी ग्वाही पाटील यांनी दिली. कोल्हापूर-सांगली लोकल रेल्वे सुरू होत असल्याने दैनंदिन प्रवास करणार्‍या नोकरदारांची, तसेच सामान्य प्रवाशांची सोय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button