कोल्हापूर महापालिका : महाआघाडीत बिघाडी; स्वतंत्र लढणार | पुढारी

कोल्हापूर महापालिका : महाआघाडीत बिघाडी; स्वतंत्र लढणार

कोल्हापूर ; सतीश सरीकर : शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादीने महाविकास आघाडी स्थापन करून राज्यात सत्ता मिळविली. महाविकास आघाडीच्या वतीने सुरुवातीला राज्यातील काही निवडणुका एकत्रित लढविल्या गेल्या. परंतु, आता हळूहळू स्वतंत्र लढण्याचा नारा तिन्ही पक्ष देऊ लागले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातही महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे. शिवसेनेने तर महापालिका निवडणुकीत स्वबळावर रणांगणात उतरण्याचे नुकतेच जाहीर केले आहे, तर काँग्रेस व राष्ट्रवादीने यापूर्वीच स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

इच्छुकांची संख्या जास्त असल्याने बंडखोरी टाळण्यासाठी हा पर्याय निवडला जाणार आहे. निकालानंतर मात्र तिन्ही पक्ष एकत्रित येऊन महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे; अन्यथा शिवसेनेला डावलून काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येतील, असे सांगण्यात येते.

कोल्हापूर महापालिकेत अपरिहार्य कारणाने पहिल्यांदा काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना यांची महाविकास आघाडी झाली. 2015 च्या निवडणुकीनंतर कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. काँग्रेसने सर्वाधिक जागा पटकावल्या. परंतु, त्यांना सत्तेपर्यंत पोहोचता आले नाही. परिणामी समविचारी राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी करून काँग्रेसने महापालिकेवर झेंडा फडकविला.

मात्र, सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी व विरोधी भाजप-ताराराणी आघाडी यांच्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतपत नगरसेवकांचा फरक असल्याने अवघे चार नगरसेवक असलेल्या शिवसेनेला डिमांड आली होती. परिणामी शिवसेना विरोधकांच्या गळाला लागून हातातील सत्ता जाऊ नये यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला सत्तेत सामावून घेतले आणि अशाप्रकारे महापालिकेत महाविकास आघाडी निर्माण झाली.

सर्वच पक्षांची सावध भूमिका

दरम्यान, एक प्रभाग रचना पद्धतीने निवडणुका होणार असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्धार केला होता. परंतु, आता त्रिसदस्य प्रभाग रचनेनुसार निवडणुका होत आहेत. कोल्हापूर महापालिका मध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारे बहुसदस्य पद्धतीने निवडणूक होत आहे.

एका मतदारसंघात 16 ते 18 हजार मतदार असणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांना अंदाज बांधणे कठीण झाले आहे. इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. मात्र, पक्षीय पातळीवर निर्णय घेण्यासाठी नेत्यांना अद्याप वेळ मिळालेला नाही. अद्याप निवडणुकांची तारीख ठरलेली नसल्याने पक्षीय पातळीवर सध्यातरी सावध भूमिका घेत हालचाली सुरू आहेत.

राज्यात महाविकास आघाडी अस्तिवात असली तरी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे तिन्ही पक्ष स्वतःचे अस्तित्व जास्तीत जास्त वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वतंत्रपणे लढेल, असे जाहीर केले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही तीच भूमिका आहे. परंतु, निवडणुकीनंतर काही ठिकाणी समविचारी पक्ष एकत्र येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यावेळीही हाच फॉम्युर्ला वापरला जाण्याची शक्यता आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांचा मुख्य विरोधक भाजप आहे. परंतु, काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनाही एकसंध नसल्याचे वास्तव आहे. तरीही पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील मैत्रीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीत काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी आतापासून प्रयत्न सुरू केले आहेत.

काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्याविरोधात सर्वच प्रभागांत भाजपचे उमेदवार असतील. भाजपला ताराराणी आघाडीची साथ असेल. ज्या प्रभागात भाजपचे कार्ड चालणार नाही, त्याठिकाणी ताराराणी आघाडीचे उमेदवार रिंगणात उतरविण्यात येणार असल्याचे समजते. भाजप-ताराराणी आघाडीची धुरा माजी खासदार धनंजय महाडीक यांच्या खांद्यावर असणार आहे.

Back to top button