कोल्हापूर : पावसाळ्यानंतरच मेघोली धरण पुनर्बांधणीस मुहूर्त? | पुढारी

कोल्हापूर : पावसाळ्यानंतरच मेघोली धरण पुनर्बांधणीस मुहूर्त?

कोल्हापूर; सुनील सकटे : मेघोली धरण फुटून सहा महिने होत आले तरी पुनर्बांधणीस मुहूर्त मिळेनासा झाला आहे. पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ कार्यालयातील अनास्था आणि तांत्रिक समितीचा अहवाल अशा विविध कारणांमुळे आता पावसाळ्यानंतरच धरण पुनर्बांधणीस मुहूर्त सापडेल, असे दिसते.

जिल्ह्यातील अनेक धरणांना गळतीचा धोका असून, मेघोली धरण एक सप्टेंबर 2021 रोजी फुटले. धरण फुटल्याने शेतीसह नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एका महिलेस जीव गमवावा लागला.

27 जानेवारी 2022 रोजी धरण तांत्रिक समितीने धरणस्थळी भेट दिली आहे. या समितीने धरण पुनर्बांधणीसंदर्भात आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. परंतु धरण फुटून सहा महिने होत आले तरी केवळ भेटी, सूचना असाच प्रकार सुरू आहे. तांत्रिक समितीस अहवाल सादर करण्यास दोन महिन्यांची मुदत दिल्याने धरण बांधणी लांबणीवर पडणार हे सिद्ध झाले आहे.

वरिष्ठ कार्यालयातील अधिकार्‍यांनी भेटी दिल्या. धरण फुटूनन तब्बल सहा महिने होत आले तरी अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. स्थानिक कार्यालयाने आपल्या स्तरावर सर्वेक्षण करून वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनांनुसार नियोजन सुरू केले. स्थानिक कार्यालयाने धरण पुनर्बांधणीसाठी 25 कोटी रुपयांचे प्राथमिक अंदाजपत्रक तयार केले आहे. हे अंदाजपत्रक मंडल कार्यालयास सादर असून, तेथून ते मुख्य अभियंता व इतर वरिष्ठ कार्यालयांत मंजुरीसाठी जाणार आहे.

सुरुवातीपासूनच गळती

मेघोली धरण बांधल्यापासूनच गळती सुरू असल्याने पायातील दगड पारगम्यता तपासणीसाठी 200 फूट खोल विंधन विवरे घेण्यात आली आहेत. सध्या या दगडांतून क्षमतेपेक्षा जास्त पाणी वाहून जाते.

Back to top button