कोल्हापूर : मिरचीचा तोरा वाढला

कोल्हापूर : मिरचीचा तोरा वाढला
Published on
Updated on

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : दरवाढीने मिरचीचा ठसका बसला असून, मिरचीचे भाव गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढले आहेत. यामुळे वर्षभराच्या चटणीची तजवीज करणार्‍या गृहिणींना महागाईचा सामना करावा लागत आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असून, बाजारात मिरचीचा तोरा अधिकच असल्याचे दिसून येते. मिरचीच्या भावासोबत मसाल्याचेही दर वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. यामुळे सर्वसामान्यांना दरवाढीचा ठसका लागतो आहे.

दरवर्षी साधारणत: उन्हाळ्यात मार्च, एप्रिल व मे महिन्यामध्ये घरगुती चटणी तयार केली जाते. त्यानुसार या हंगामातील मिरचीची आवक बाजारपेठेत सुरू झाली आहे. मात्र, यंदा आवक कमी होणार असल्याचा अंदाज आहे. कारण, मिरचीमधून अधिकचा तोटा होत असल्याने शेतकरी मिरची लागवडीकडे दुर्लक्ष करीत आहेत.

उन्हाचा तडाखा वाढेल तसा मिरचीचा भावही वधारतो आहे. वार्षिक खरेदी असणारी मिरची साफ केलेली, देठ तोडलेली हवी असल्यास त्यासाठी किलोमागे 30 ते 50 रुपये अधिक मोजावे लागत आहेत. मिरच्या तोडण्याचा, साफ करण्याचा त्रास करून घेण्यापेक्षा देठ तोडलेल्या मिरच्या घेण्याकडे अनेकांचा कल दिसून येतो आहे.

उन्हाचा कडाका वाढल्यापासून घरगुती तिखट तसेच मसाला तयार करण्यासाठी लाल मिरचीला मोठी मागणी वाढली आहे. त्यामुळे लाल मिरचीचा तोराही चांगलाच वाढला आहे. परिणामी, ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. उन्हाळा सुरू झाल्यापासून वर्षभर पुरेल इतके लाल तिखट, मसाला तयार करण्यासाठी महिलावर्गाची धावपळ सुरू आहे. ग्रामीण भागातही चटणीसाठी लगबग सुरू झाली असून, विकतची चटणी करण्याऐवजी ठसक्याची आणि लालभडक कटाची घरगुती चटणी तयार करण्यात महिला गुंतल्या आहेत. त्यामुळे बाजारात लाल मिरचीला मागणी वाढली आहे.

बाजारात बेडगी, गुंटूर, तेजा म्हणजेच लवंगी, संकेश्‍वरी, काश्मिरी आणि जवारी मिरची उपलब्ध आहे. या प्रमुख मिरच्यांच्या जातींतही उपजाती असून, कोल्हापूरच्या बाजारात येणारी लाल मिरची प्रामुख्याने कर्नाटक, आंध— प्रदेश , तेलंगणा आदी भागातून येते. मिरच्यांच्या प्रमुख जाती आणि त्यांच्या उपजाती म्हणजेच संकरित बियाणेदेखील बाजारात उपलब्ध आहेत. त्यांच्या दर्जानुसार किमतीत तफावत आढळून येत आहे.

लाल मिरचीचे प्रतिकिलो दर

संकेश्‍वरी               700 ते 1,500
काश्मिरी                480 ते 600
बॅडगी (केडीएल)     450 ते 550
बॅडगी (डीडी)         400 ते 550
रुद्रा बॅडगी            360 ते 400
सिजेंटा बॅडगी         320 ते 450
हैदराबाद बॅडगी     280 ते 350
तेजा म्हणजे लवंगी  280 ते 300
देशी जवारी           280 ते 300
गुंटूर                    180 ते 220

गेल्यावर्षीपेक्षा यंदा 25 ते 30 टक्के दर जास्त आहेत. निसर्गातील लहरीपणाचा फटका भाजीपाल्यासह इतर पिकांप्रमाणचे मिरचीलाही बसला आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून मिरची उत्पादनात घट होत आहे. परिणामी, मागणीच्या मानाने आवक कमी असल्याने मिरचीचा भाव चढाच राहणार आहे.
– सुनील अस्वले, मिरची व्यापारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news