11th Admission: अकरावीची शहरस्तरीय प्रवेशप्रक्रिया आजपासून; रजिस्ट्रेशन सुरू ; विज्ञान, वाणिज्य शाखेचे प्रवेश ऑनलाईन
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा: शहरातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीची केंद्रीय प्रवेश (वाणिज्य इंग्रजी माध्यम व विज्ञान शाखा) प्रक्रिया शुक्रवारी (दि. २) दुपारी १ वाजल्यापासून विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या www.dydekop.org या संकेतस्थळावरून भाग – १ विद्यार्थी रजिस्ट्रेशनने सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक तथा केंद्रीय प्रवेश समितीचे अध्यक्ष महेश चोथे यांनी दिली.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत मार्च- २०२३ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी (दि. २) दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ साठीची प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू होत आहे. २०२३-२४ साठी २८ कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य (इंग्रजी माध्यम) १६०० आणि विज्ञान ५ आहे. हजार ८८० अशा एकूण ७ हजार ४८० जागांसाठी राबविली जाणार आहे. वाणिज्य (इंग्रजी) आणि विज्ञान शाखेचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने भाग-१ व भाग-२ भरून साधारण ४ ते ५ फेऱ्यांमध्ये करण्याचे निश्चित करण्यात आले.
सुरुवातीच्या टप्यात भाग – १ मध्ये विद्यार्थी रजिस्टेशन करावयाचे आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वसाधारण माहितीचा (उत्तीर्ण वर्ष, बोर्ड, आसन क्रमांक, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, जन्मतारीख, प्रवेश अर्ज फी) यांचा समावेश असणार आहे. विद्यार्थ्यांना दहावीचे मूळ गुणपत्रक प्राप्त झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेचे पुढील वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. विद्यार्थी व पालकांना या संकेतस्थळावर महाविद्यालयाची संयुक्त माहिती पुस्तिका, गतवर्षीचा कट ऑफ प्रवेश प्रक्रियेची माहिती पुस्तिका व फॉर्म कसा भरायचा याबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती शिक्षण उपसंचालक चोथे यांनी दिली आहे.
कनिष्ठ महाविद्यालये- २८
प्रवेश क्षमता – ७ हजार ४८०
वाणिज्य (इंग्रजी माध्यम)- १६०० आणि विज्ञान- ५८८०

