‘जयप्रभा’त चित्रीकरण सुरू राहावे | पुढारी

‘जयप्रभा’त चित्रीकरण सुरू राहावे

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : जयप्रभा स्टुडिओ जागेचा वापर चित्रीकरणासाठी करण्यात येत होता. आता स्टुडिओ जागेची विक्री झाली आहे. तो कोणी विकत घेतला याच्याशी आम्हाला देणे-घेणे नाही. पण जयप्रभा स्टुडिओ जागेचा वापर चित्रीकरणासाठी करण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बैठकीत करण्यात आली. या मागणीसाठी आज (दि. 13) पासून जयप्रभा स्टुडिओच्या दारात साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचे महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी सांगितले.

कोल्हापूरची अस्मिता असणार्‍या जयप्रभा स्टुडिओची यापूर्वी विक्रीची घटना घडली तेव्हा कोल्हापूरच्या कलाप्रेमी जनतेने आंदोलन हाती घेतले. आता नव्याने स्टुडिओ विक्रीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि सर्व चित्रपट व्यावसायिक कलाकार, तंत्रज्ञ, कामगार यांची तत्काळ महामंडळाच्या कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली.

या बैठकीत बोलताना धनाजी यमकर म्हणाले, जयप्रभा स्टुडिओसाठी महामंडळाच्या वतीने आंदोलन हाती घेण्यात आले होते. कोल्हापूर महापालिकेने ही जागा चित्रीकरणासाठी आरक्षित राहावी, असा ठरावही केला होता. असे असताना या जागेची विक्री कशी झाली याची माहिती महापालिकेकडून घेण्यात येणार आहे. तसेच जयप्रभा स्टुडिओ जागेचा चित्रीकरणासाठी वापर करावा यासाठी साखळी उपोषण करणार असल्याचे सांगितले.

या बैठकीस सहखजिनदार शरद चव्हाण, संचालक रणजित जाधव, सतीश बिडकर, स्वीकृत संचालक रवी गावडे, मिलिंद अष्टेकर, इम्तियाज बारगीर, स्वप्नील राजशेखर, माजी नगरसेविका सुरेखा शहा, छाया सांगावकर, रोहन स्वामी, अमर मोरे, अर्जुन नलवडे, बाबा पार्टे, विजय शिंदे, अवधुत जोशी, संग्राम भालकर व कलाकार उपस्थित होते.

नव्याने प्रयत्न : महामंडळ अध्यक्ष

जयप्रभा स्टुडिओची जागा ही कोल्हापूरकरांच्या अस्मितेचा विषय आहे. या जागेवर पुन्हा चित्रीकरण करण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करू. या वास्तू शासनाने ताब्यात घेण्यासाठी यापूर्वी पत्रव्यवहार करण्यात आला होता आता नव्याने त्याचा पाठपुरावा करू, असे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी सांगितले.

स्टुडिओ शासनाने ताब्यात घ्यावा : कृती समितीची मागणी

जयप्रभा स्टुडिओ हा शासनाच्या मदतीने महापालिकेने आपल्या ताब्यात घ्यावा. ज्याने आता हा स्टुडिओ विकत घेतला आहे, त्यांना मोबदला द्यावा किंवा याठिकाणी जयप्रभा स्टुडिओ पूर्ववत ठेवून चित्रपट निर्मिती सुरू ठेवावी व या वैभवाचे जतन करावे, अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने केली आहे. अशोक पवार, रमेश मोरे आदींच्या यावर सह्या आहेत.

Back to top button