

कोल्हापूर ; आशिष शिंदे : प्रथिनांसाठी जगभर डाळींना मागणी वाढत आहे. कोल्हापुरात दररोज 40 ते 50 टन तूरडाळीची आवक होते. तूरडाळीची आवक सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ हरभरा आणि कडधान्यांचा समावेश होतो. जिल्ह्यात आणि कोकणात तूरडाळीला मोठी मागणी आहे. गुरुवारी (दि. 10) जागतिक डाळ दिन साजरा होत आहे. यानिमित्ताने घेतलेला बाजारपेठेचा आढावा.
गेल्या पंधरा वर्षांत जगभरामध्ये डाळींचे उत्पादन, व्यापार आणि खप यात भरीव वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही डाळींच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यात सोलापूर, लातूर, अकोला मार्केटमधून डाळ येते. तूरडाळी पाठोपाठ हरभरा डाळीला मागणी आहे. जिल्ह्यात दररोज सुमारे 30 ते 40 टन हरभरा डाळीची आवक आहे. मोठ्या बाजारपेठांमधून आलेल्या डाळी कोल्हापुरातून कोकण तसेच गोव्याला जातात.
कडधान्ये, डाळी पोषकतत्त्वांनी भरलेल्या आहेत. कडधान्यांमध्ये चरबीचे (फॅट) प्रमाण कमी असते आणि विरघळणार्या फायबर्सचे प्रमाण भरपूर असते. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासदेखील मदत होते. यामुळे आहारतज्ज्ञ मधुमेह आणि हृदयविकार यासारख्या असंसर्गजन्य आजारांच्या व्यवस्थापनासाठी आपल्या दैनंदिन आहारामध्ये डाळींचा समावेश करण्यास सांगतात.
जागतिक डाळी दिन
संयुक्त राष्ट्रसंघाने भूकमुक्त जगा आणि सर्वांना पौष्टिक अन्न हा संकल्प जाहीर केला आहे. त्यातून जगातील प्रत्येक मानव जातीचे योग्य प्रकारे पोषण व्हावे असा संदेश देत 10 फेब्रुवारी रोजी जागतिक डाळ दिनाची घोषणा करण्यात आली. या माध्यमातून डाळींच्या पौष्टिक फायद्यांविषयी जनजागृती करण्यात येत आहे. शाश्वत कृषी अन्न प्रणालीचे धेय गाठण्यासाठी डाळींच्या माध्यमातून तरुणांना सक्षम करण्यात यावे, ही यंदाच्या जागतिक डाळी दिनाची थीम आहे.
डाळींचे 70 हून अधिक व्यापारी
कोल्हापूरमध्ये सुमारे 70 व्यावसायिक होलसेल, तसेच रिटेलमध्ये डाळींचा व्यापार करतात; मात्र अनेक किरकोळ व्यापार्यांना जबर फटका बसल्याचे वैभव सावर्डेकर यांनी सांगितले. बदलते वातावरण, अवकाळी पाऊस यामुळे एप्रिल-मे महिन्यांमध्ये डाळींचे दर कडाडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
डाळींमध्येही सोडियमचे प्रमाण कमी असल्याने उच्च रक्तदाबासारख्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. डाळी वनस्पती आधारित प्रथिनांचे उत्कृष्ट स्रोत आहेत. 100 ग्रॅम कोरड्या मसूरमध्ये 25 ग्रॅम प्रथिने असतात. डाळी लोहाचा चांगला स्रोत आहेत. डाळींच्या सेवनामुळे कुपोषणाची समस्या दूर होण्यास नक्कीच मदत होते. याशिवाय डाळींमुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहते. पचन आणि स्नायूंचे कार्य उत्तम चालण्यासदेखील मदत होते.
– डॉ. विदुर कर्णिक, हृदयविकारतज्ज्ञ