

आजरा : पुढारी वृत्तसेवा : गव्यांच्या झुंजीत एका गव्याचा मृत्यू झाला. मंगळवारी पहाटे ही घटना आजरा-गडहिंग्लज मार्गावरील सुलगाव वनक्षेत्राच्या हद्दीतील मसोबा देवालयानजीक घडली. मृत गवा बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
आजरा तालुक्यात गव्यांचे वास्तव्य आहे. सुलगाव ते सोहाळे गावांच्या दरम्यान सकाळी व सायंकाळच्या दरम्यान गव्यांचा कायम वावर असतो. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, सुलगाव वनक्षेत्राच्या हद्दीत मंगळवारी पहाटे गव्यांची झुंज झाली असावी, असे घटनास्थळावरील पायाचे खूर, मोडलेली झाडेझुडपे यावरून प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
या झुंजीत एका गव्याचा मृत्यू झाला. मृतावस्थेतील गवा हा आजरा-गडहिंग्लज मार्गाच्या नजीक अगदी 50 फूट अंतरावर पडला होता. ही घटना वनविभागास सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास समजली. यावेळी आजरा परिक्षेत्र वन अधिकारी स्मिता डाके, वनपाल बाळेश न्हावी, वनरक्षक संगीत राठोड, कृष्णा डेळेकर यांनी घटनास्थळी भेट दिली.
त्यांनी तालुका पशुधन विस्तार अधिकारी डॉ. पी. जी. ढेकळे यांनी शवविच्छेदन केले असता, तो गवा 7 ते 8 वय वर्षांचा पूर्ण वाढ झालेला होता, असे सांगितले. तसेच या गव्याला न्यूमोनिया झाल्यामुळे तो आजारी असल्याने या झुंजीत त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मृत गव्याचे सायंकाळी सुलगाव वनक्षेत्रातील रोपवाटिकेजवळ दहन करण्यात आले.