कोल्हापूर : दाट धुक्याने शहरावर ओढली चादर | पुढारी

कोल्हापूर : दाट धुक्याने शहरावर ओढली चादर

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : शहर आणि परिसरात सोमवारी सकाळी दहा वाजल्यानंतरच सूर्यदर्शन झाले. तोपर्यंत शहरावर दाट धुक्याने जणू चादरच ओढली होती. दहा वाजल्यानंतर धुके विरळ होत गेले. गेल्या काही दिवसांत प्रथमच सकाळी उशिरापर्यंत धुक्याची तीव्रता राहिली.

गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. थंडीचा कडाका काहीसा कमी होत चालला आहे. मात्र, आज शहर आणि परिसरात दाट धुके पडले. सकाळी सहा-साडेसहा वाजल्यापासूनच धुक्याची दुलई पसरली होती. काही वेळातच त्याची तीव्रता वाढत गेली.धुके इतके दाट होते की, अवघ्या 15-20 फुटांवरीलही काही दिसत नव्हते. वाहनधारकांना तर दिवे लावूनच वाहने चालवावी लागत होती.

धुक्यामुळे शहराचा बहुतांश भाग प्रभावित झाला होता. रंकाळा, कळंबा तलाव, शिवाजी पूल, शिवाजी विद्यापीठ, न्यू पॅलेस, टाऊन हॉल आदी इमारती धुक्यात हरवून गेल्या होत्या. दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहूंचा पुतळा, व्हीनस कॉर्नरवरील छत्रपती राजाराम महाराजांचा पुतळा, विद्यापीठातील छत्रपती शिवरायांचा पुतळा आदींचे धुक्यामुळे दिसणारे रूप विलोभनीय होते. मोकळ्या जागेेत अनेक ठिकाणी गवत, झाडे, वेलींवर दवबिंदूही दिसत होते.

सकाळी दहा वाजेपर्यंत धुके होते. दहा वाजल्यानंतरच शहराच्या अनेक भागात सूर्यदर्शन झाले. यानंतर मात्र अवघ्या दहा-पंधरा मिनिटांत धुके विरळ होत गेेले. तरीही सकाळी अकरा-साडेअकरा वाजेपर्यंत रंकाळा तलाव परिसरात धुके दिसतच होते. धुक्यामुळे ‘मॉर्निंग वॉक’ करणार्‍यांची संख्याही आज काहीशी रोडावलेली होती. सकाळी थंडीही जाणवत असल्याने अनेकांनी लवकर घराबाहेर पडण्याचेही टाळले. दरम्यान, आज शहरात 18 अंश इतक्या किमान तापमानाची नोंद झाली.

Back to top button