हातकणंगले शहरातील नगरपंचायतीत नगरसेवकांना कोंडले | पुढारी

हातकणंगले शहरातील नगरपंचायतीत नगरसेवकांना कोंडले

हातकणंगले ; पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. आठ दिवस नळाला पाणी न आल्याने संतप्‍त महिलांनी नगरपंचायतीवर मोर्चा काढून उपनगराध्यक्षांच्या पतीसह नगरसेवक आणि कर्मचार्‍यांना कोंडून घातले.

विद्युत मोटार खराब झाल्याने पाणीपुरवठा अनियमित झाला होता. सध्या मोटार दुरुस्तीचे काम सुरू आहे. ते झाल्यानंतर तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्‍वासन नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर यांनी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
हातकणंगलेचा पाणी प्रश्‍न गंभीर बनला आहे.

जलवाहिन्यांची गळती, नादुरुस्त मोटार, वीज नाही, नादुरुस्त पंप अशा अनेक कारणांमुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. पाणीपुरवठ्याबाबत विचारल्यास लोकप्रतिनिधी, प्रशासन किंवा कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. आज त्यांचा उद्रेक होऊन संतप्‍त माहिलांनी नगरपंचायतीवर मोर्चा काढला.

मोर्चाला सामोरे जाताना विरोधी भाजपचे नगरसेवक रमजान मुजावर, अण्णासोा चौगुले, दिनानाथ मोरे उपस्थित होते. यावेळी महिलांनी त्यांनाही धारेवर धरले. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष किंवा इतर लोकप्रतिनिधी हजर नसल्याने महिलांनी थेट कार्यालयालाच टाळे ठोकले. नगराध्यक्षांच्या आश्‍वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Back to top button