राज्यात यंत्रमागधारकांना 2,400 कोटींचा लाभ | पुढारी

राज्यात यंत्रमागधारकांना 2,400 कोटींचा लाभ

इचलकरंजी ; शरद सुखटणकर : वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांच्या 27 अश्‍वशक्‍तीवरील यंत्रमागधारकांची वीज सवलत कायम ठेवण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील 13 हजार यंत्रमाग वीज ग्राहकांना 2,400 कोटींचा लाभ होणार आहे. या धोरणाचा सर्वाधिक लाभ इचलकरंजी केंद्रातील 2,558 यंत्रमाग ग्राहकांना होणार असून, त्यांचे वार्षिक 600 कोटी रुपये वाचणार आहेत. त्याखालोखाल भिवंडी, मालेगाव येथील यंत्रमागधारकांना लाभ होणार आहे.

वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी राज्य शासनाकडून यंत्रमागधारकांना वीज दरात सवलत दिली जात होती. अलीकडच्या काळात काही यंत्रमागधारकांकडून सवलतीच्या दरात मिळणार्‍या विजेचा गैरवापर होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. वीज सवलत मिळण्यासाठी यंत्रमागधारकांनी ऑनलाईन माहिती भरण्याचे आदेश वस्त्रोद्योग विभागाने काढले. माहिती न भरणार्‍या यंत्रमागधारकांची सवलतही बंद केली आणि वाढीव दराने ग्राहकांना बिले पाठवली. वीज सवलत बंद केल्यामुळे यंत्रमागधारकांचे धाबे दणाणले. दुप्पट दराने वीज बिले हाती पडल्यामुळे यंत्रमागधारकांतून तीव्र संताप व्यक्‍त झाला.

इचलकरंजी शहरात 27 अश्‍वशक्‍तीवरील 2,558 कनेक्शन आहेत. सध्या प्रतियुनिट 4 ते 4.25 रुपये आकारले जातात. या कनेक्शनचे महिन्याला साधारणत: 50 कोटी रुपयांचे बिलिंग होते. वीज सवलत बंद झाल्यामुळे हा आकडा अंदाजे 100 कोटींच्या घरात गेला असता.

वस्त्रोद्योगातील कोणत्याही घटकाला वाढीव दराप्रमाणे वीज बिले भरणे शक्यच नव्हते. वीज सवलत बंदच्या निर्णयावर पुनर्विचार होणे आणि तो आदेश रद्द करणे गरजेचेच होते. इचलकरंजीच्या संवाद दौर्‍यावेळी मंत्री शेख यांनी 29 डिसेंबर 2021 रोजी काढलेला आदेश रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे यंत्रमागधारकांचा जीव भांड्यात पडला.

75 पैसे सवलतीच्या घोषणेकडे लक्ष

यापूर्वी तत्कालीन मंत्री सुभाष देशमुख यांनी साध्या यंत्रमागधारकांना 1 रुपयाची अतिरिक्‍त सवलत देण्याची घोषणा केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अत्याधुनिक यंत्रमागधारकांसाठी 75 पैशांची सवलत देण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात मात्र या घोषणांची अंमलबजावणी झालीच नाही. त्यामुळे मंत्र्यांच्या घोषणा हवेत विरल्या. मंत्री शेख यांनीही वीज दर सवलत सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी तातडीने व्हावी, अशी अपेक्षा आहे.

Back to top button