लता मंगेशकर : दीदी… एकमेवाद्वितीय

लता मंगेशकर : दीदी… एकमेवाद्वितीय
Published on
Updated on

लतादीदी ही आमच्यामागं आयुष्यभर सावली म्हणून उभी राहिली. ती देवानं बनवलेली एक खास मूर्ती होती. देवानं अशी मूर्ती बनवण्याचा विचार जरी पुन्हा केला, तरी त्यालाही ते शक्य होणार नाही. दीदीचा आवाज आणि तिचं गाणं ऐकलं, की अंगावर रोमांच उभं राहतात, डोळ्यात पाणी येतं. हा अलौकिक स्वर भूतलावर मंगेशकर कुटुंबात आला आणि मी तिची बहीण म्हणून जन्माला आले, यासारखं दुसरं भाग्यच असू शकत नाही. सगळे म्हणतात, या दोघी जणी दोन डोळ्यांसारख्या आहेत. दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारी. पण त्यांना हे माहीत नाही, की दोन डोळ्यांना प्रकाशाची जाणीव देणार्‍या नसा एकच आहेत आणि जर एका डोळ्यात काही गेले, तर दुसर्‍यात पाणी येते. आज या पाण्याचा बांध फुटला आहे…

लतादीदी… जिच्यासारखी गायिका अजून जन्माला आली नाही… एकमेवाद्वितीय… न भूतो न भविष्यति… अशा दीदीची बहीण होण्याचं भाग्य लाभणं म्हणजे मंगेशानं मला दिलेलं देणंच. दीदी साक्षात सरस्वती होती. तिच्या चरणांवर डोकं ठेवून मी तिला दीर्घायुष्य लाभावं म्हणून सदैव प्रार्थना करत असे… पण नियतीपुढं कुणाचंच काही चालत नाही…

दीदी माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठी. मास्टर दीनानाथ म्हणजेच बाबा गेल्यानंतर दीदीनं अफाट कष्ट करून आम्हा भावंडांना सांभाळलं. घर सावरलं. तिनं सिनेमासाठी गाणी गायला सुरुवात केली. तिला संधी मिळत गेली आणि खरं सांगू, देवानं तिला मानाची जागा दिली. अगदी पहिल्यापासनूच… त्या जागेवर ती सम्राज्ञीसारखी राहिली… आयुष्यभर. तिनं जिद्द मनात धरली होती मी मोठी होणारच! आणि ते ध्येय तिनं पूर्ण केलं. दीदीचा आवाज आणि तिचं गाणं ऐकलं, की अंगावर रोमांचं उभं राहतं, डोळ्यात पाणी येतं. हा अलौकिक स्वर भूतलावर मंगेशकर कुटुंबात आला आणि मी तिची बहीण म्हणून जन्माला आले, यासारखं दुसरं भाग्यच असू शकत नाही.

दीदीबाबतच्या आठवणी किती सांगायच्या! पण आयुष्यभर मला आठवतो एक अगदी वेगळा प्रसंग. त्या दिवशी आमची माई गावाला गेली होती. दीदी घरात पुरणाचे जेवण करणार होती. गणपती जवळ आले होते. माई घरात नसल्यावर जो उधम चालतो, तोच आमच्या घरी चालला होता. तेवढ्यात काय झाले, एक छोटासा उंदीर कुठून आला होता कुणास ठाऊक, तो रसोईत सारखा नाचत होता.

दीदीला कसला राग आला होता कोण जाणे! ती जी उठली तो तिने हातातले लाटणे घातले उंदरावर. मेले की ते पिटुकले! आणि मग काय विचारता! पुरणाचे जेवण-बिवण राहिले सगळे एकीकडेच. गणपती आले असताना गणपतीचे वाहनच मारले मी म्हणून दीदी रडत बसली किती दिवस! नंतर ते अशुभ वर्ष आले. सगळीकडे अंधार झाला. कुठलाही आसरा नव्हता. आम्ही अगदी निराधार झालो. आमचे बाबा वारले होते.

बाबा गेले तरी 'दुसरे बाबा' फक्‍त बारा वर्षांचे, परकर पोलका नेसून आम्हाला सांभाळायला सज्ज झाले होते. दीदी. हो, बाबांच्या पश्‍चात दीदीने सगळा भार आपल्या एवढ्याशा खांद्यावर उचलला होता. आम्ही कोल्हापूरला गेलो. दीदी विनायकांच्या कंपनीत काम करू लागली. काम करता करता माईच्या मागे तिचा सारखा लकडा चालू असे. 'माई, मुलांना शाळेत घाल. त्यांची वये गेली नाहीत अजून. मी त्यांना खूप शिकवणार आहे. माझ्या भावंडांना मी डॉक्टर करणार आहे. इंग्लंडला पाठवणार आहे.' त्यावेळी ती कशी कामे करी, याची आठवण सांगते.

'गजाभाऊ' चित्रपटातल्या गाण्याचे शूटिंग होते आणि दीदींच्या अंगात एकशे चार ताप होता. माई तिला म्हणाली, 'लता, आज तू कामाला जाऊ नकोस.' पण दीदी म्हणाली, 'नाही, गेलेच पाहिजे.' तिला आपल्या जबाबदारीची कल्पना होती. तशा अवस्थेत ती कामाला गेली आणि भर तापात ते गाणे तिने केले. गाणेदेखील विलक्षण होते. दीदीच्या अंगात परीचे कपडे घातले होते आणि पंखांना दोर्‍या बांधून बिचारीला टांगून ठेवले होते. तशा अवघडलेल्या स्थितीत तिने शूटिंग केले.

दीदी भांडकुदळसुद्धा तितकीच होती! एका साध्या सेफ्टीपिनसाठी माझ्याशी इतकी भांडायची, की शेवटी तिची माझी मारामारी ही ठरलेलीच. ती नंबर एकची हट्टी आणि मी म्हणजे पहिलवान! पठाण याच नावाने ओळखली जाणारी. मग काय? मारामारी ही हवीच. कधी कधी दुपारच्या वेळी आम्ही बहिणी खेळ खेळायचो.

भातुकलीचा खेळ. त्या खेळासाठी डाळीचे लाडू, चुरमुर्‍याचा भात अशी रसोई आम्ही तयारी करून ठेवायचो. अशा वेळी दीदी एक नवाच खेळ सुचवायची. ती म्हणायची, 'मी जसा काही चोर. तुम्ही घरात सगळे झोपलेले असणार. मग मी हळूच येऊन चोरी करणार. मग मला तुम्ही पकडणार!' झाले. आम्हाला कल्पना पसंत पडायची. दीदी आमच्या घरकुलात येऊन चोरी करून जायची आणि आम्ही तिला पकडेपर्यंत भातुकलीतल्या सार्‍या जेवणाचा तिने चट्टामट्टा केलेला असायचा.

तेव्हा कुठे तिचा डाव आमच्या ध्यानात यायचा. मग पुन्हा भांडण सुरू. कधी कधी दीदी मीनाताईला नि मला बाहेर गॅलरीत न्यायची, 'मी भूत आहे. हा हा हा! आता मी जे सांगेन तेच तुम्हाला केले पाहिजे. नाहीतर मी तुम्हाला खाऊन टाकीन. आऊ!' आम्ही भिऊन तिची सारी कामे करायचो. घरात माईने जेवायला बोलावले, की आम्ही डोळे पुसत, भीत भीत पानावर येऊन बसावे. एकदा वाटे, दीदी कशी भीती दाखवते ते माईला सांगून टाकावे; पण ही आमच्याकडे टवकारून बघत असायची. डोळे मोठे करून 'नाही नाही' अशा अर्थाची मान हलवायची. पण आम्ही 'आप' करून डोळे पुसत बसायचो. अशी ही खट्याळ दीदी.

माझी मते आणि तिची मते यात दोन टोकांचे अंतर होते. मी बॉब करते, तर ती दोन वेण्या घालायची. मी रुंद गळ्याचे ब्लाऊज घालते, तर ती बंद गळ्याचे. ती सारखीच पांढर्‍या रंगाचा पोशाख करायची, तर मला गुलाबी रंग प्रिय. माझ्या – तिच्या राहणीत, विचारात फार फरक होता. एवढेच काय, मी एकदम फटकळ, तर ती सगळे मनात ठेवणारी. ती बारीक सडसडीत, तर मी चांगली गरगरीत. ती नाजूक सॅड गाणी गायची, तर मी सगळ्या ढंगांची गाणी गात असते.

ती म्हणायची, 'मी कलेसाठी जगते', तर मी म्हणते, 'कला माझ्यासाठी आहे.' सगळे म्हणतात, 'या दोघी जणी दोन डोळ्यांसारख्या आहेत. दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारी. पण त्यांना हे माहीत नाही, की दोन डोळ्यांना प्रकाशाची जाणीव देणार्‍या नसा एकच आहेत आणि जर एका डोळ्यात काही गेले तर दुसर्‍यात पाणी येते. आज या पाण्याचा बांध फुटला आहे…

– आशा भोसले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news