कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पाऊस ; अनेक बंधारे पाण्याखाली | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पाऊस ; अनेक बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पाऊस पडअसून अनेक बंधारे पाण्याखाली गेली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस सर्वदूर कोसळत आहे. गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने दमदार पुनरागमन केले आहे.

दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. धरणांच्या पाणी पातळीतही वेगाने वाढ होत आहे. अनेक जिल्हा तसेच राज्यमार्गावर पाणी आल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे.

बुधवारी अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. इचलकरंजीतही जुन्या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे.

गडहिंग्लजला जोरदार हजेरी

गडहिंग्लज ः तालुक्यात बुधवारी पावसाची संततधार कायम राहिली. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. हिरण्यकेशीच्या पाण्यामध्ये वाढ झाली आहे. तालुक्यातील महागाव, नेसरी, हलकर्णी, कडगाव या ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या तालुक्यात भात रोपांची लागण जवळपास अंतिम टप्प्यात आली असून, पावसाने या सगळ्याला दिलासा मिळाला आहे.

राधानगरीत मुसळधार

कौलव : राधानगरी तालुक्यात आज मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तिन्ही धरण क्षेत्रात दमदार पावसाने पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. तालुक्याच्या सर्वच भागांत सलग दोन दिवस संततधार पावसाने हजेरी लावली आहे. तिन्ही धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. राधानगरी धरण 62 टक्के, तुळशी धरण 61 टक्के तर काळम्मावाडी धरण 53 टक्के भरले आहे. भोगावती, तुळशी व दूधगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

चंदगडला दमदार

चंदगड : चंदगड तालुक्यात मंगळवारपासून दमदार पावसाला प्रारंभ झाला आहे. तालुक्यातील घटप्रभा, जांबरे हे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असले तरी जंगमहट्टी प्रकल्पात 50 टक्के पाणीसाठा झाला आहे. तर 15 पैकी 5 लघू पाटबंधारे तलाव भरले आहेत. कानूर बु. येथे धोंडिबा शिवराम गावडे यांच्या घरावर झाड पडून अंदाजे 1 लाखाचे नुकसान झाले. तसेच मारुती आप्पा नाईक यांच्या घराची भिंत पडून अंदाजे 20 हजारांचे नुकसान झाले. कानूर बु. येथील कृष्णा गोविंद गावडे यांच्या घरावर झाड पडून 40 हजारांचे नुकसान झाले आहे.

हिरण्यकेशीच्या पातळीत वाढ

आजरा : आजरा तालुक्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हिरण्यकेशी व चित्री नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. तालुक्यात बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या गेल्या 24 तासांत सरासरी 38 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. चित्री प्रकल्प परिसरात 42 मि.मी. पाऊस झाला असून 1368 द. ल. घ. फू. (72.50 टक्के) इतका पाणीसाठा चित्री प्रकल्पात झाला आहे. धनगरवाडी व एरंडोळ लघू पाटबंधारे तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहे. खानापूर लघू पाटबंधारे तलावात 68 टक्के पाणीसाठा झाला आहे.

कडगाव-पाटगावात अतिवृष्टी

गारगोटी : भुदरगड तालुक्यात बुधवारी दिवसभर वार्‍यासह पावसाची रिपरिप सुरू होती. तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू होता. मंगळवारी कडगाव-पाटगाव परिसरात अतिवृष्टी झाली.वेदगंगा नदी पाणी पातळीत वाढ झाली असून पाणी पात्राबाहेर पडले आहे. वेदगंगा नदीवरील वाघापूर, निळपण बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पाटगाव मौनीसागर जलाशय, फये, मेघोली लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पाटगाव जलाशयात 71. 66 टक्के पाणीसाठा झाला आहे. मेघोली 1.653 द.ल.घ.मी., फये प्रकल्पात 2.52 द.ल.घ.मी. पाणी साठा झाला आहे.

शाहूवाडीत नद्या पात्रा बाहेर

मलकापूर / बांबवडे : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. कडवी, मानोली, बर्की, पालेश्वर, कांडवण, गेळवडे धरण व जंगलव्याप्त भागात जोरदार पाऊस बरसत आहे. नद्यांची पात्रे दुथडी भरून वाहू लागली आहेत. कोपार्डे, सवते, सरूड, पाटणे, पेरीड येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धबधबे कोसळू लागले आहेत. महसूल प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मलकापूर शहरातील पूरग्रस्त भागात मलकापूर नगरपरिषदेच्या वतीने विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

पन्हाळा तालुक्यात बंधार्‍यांवर पाणी

पन्हाळा : तालुक्यात सर्वत्र संततधार पाऊस सुरू असून तालुक्यातील जांभळी कासारी, धामणी, कुंभी , वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. बाजारभोगाव-पोहाळे दरम्यानच्या मोहरीवर पाणी आले असल्याने हा रस्त्यावर वाहतूक बंद झाली आहे. मुसळधार पडणार्‍या पावसाने तीन दरवाजाखाली सोमवार पेठला जाणार्‍या रस्त्याला भेग पडली आहे. पन्हाळगडावर सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस पडत आहे. तालुक्यातील अनेक बंधार्‍यांवर पाणी आले आहे.

गगनबावड्यात अतिवृष्टी

गगनबावडा : तालुक्याला आज मुसळधार पावसाने दिवसभर झोडपून काढले. गगनबावडा परिसरात गेल्या आठ दिवसांपासून असणारा पावसाचा जोर आज आणखीन वाढला तालुक्यातील कुंभी, धामणी, सरस्वती, रूपणी या नद्या व तालुक्यातील धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कुंभी मध्यम प्रकल्प आज 80 टक्के भरला असून आज सायंकाळनंतर सांडव्यावरून 120 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना पाटबंधारे विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर झाड कोसळले

कोल्हापूर-रत्नागिरी राज्यमार्गावर रजपूतवाडीजवळ बुधवारी सकाळी पावसामुळे वडाचे झाड कोसळल्याने दोन तास वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाहनधारकांना वडणगे, केर्लीमार्गे शहरात यावे लागले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचार्‍यांनी झाड तोडून रस्ता रिकामा केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

झाड कोसल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली. सकाळी शहरात जाणार्‍या नोकरदार, कामगार वर्गाची यामुळे अडचण झाली. काहींनी रजपूतवाडी-वडणगे, केर्लीमार्गे शहर गाठले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचार्‍यांनी सुमारे दोन तास अथक परिश्रम घेऊन रस्त्यातून झाड हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.

Back to top button