कोल्हापूर : गांजाच्या झुरक्यात तरुणाई गुरफटली | पुढारी

कोल्हापूर : गांजाच्या झुरक्यात तरुणाई गुरफटली

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : अंगभर टॅटू… खायला पैसेही नाहीत… कोठून तरी गांजाची सोय करायची… निर्जनस्थळी, उद्यानात जाऊन दोन-चार झुरक्यांतच भान हरवून बसायचे. अशी काहीशी अवस्था दोन दिवसांपूर्वी हाणामारीत सापडलेल्या दोन तरुणांची होती. गांजाचा झुरका मारल्यानंतर कशाचेही भान नसणार्‍या या तरुणाचे नेमके भविष्य तरी काय, याचा विचार करण्याची वेळ समाजावर आली आहे.

शहरासह आसपासच्या उपनगरांत, नदी किनार्‍यांवर, तलावांच्या ठिकाणी आता गांजाचा धूर राजरोस निघत आहेत. अगदी सहजतेने उपलब्ध होणार्‍या या गांजामुळे कित्येकांच्या करिअरची राखरांगोळी होताना दिसून येत आहे. त्यातच सध्या महाविद्यालये बंद असल्याने अनेकांनी दररोजच्या मित्र भेटीचे कारणच गांजाचे झुरके ओढणे ठेवल्याचे दिसत आहे.

गांजाच्याच धुंदीत तिघांनी मंगळवारी दुपारी खासबाग परिसरात चाकूहल्ल्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. हे एक उदाहरण असले तरी निर्जनस्थळी होणारी लूटमार, जबरी चोर्‍यांमागेही गांजाच्या आहारी गेलेल्यांची डोकीच असल्याचे समोर येत आहे.

एका प्रसिद्ध व्यावसायिकाकडे गेलेल्या तिघांनी वादावादी सुरू केली. कशाचेच भान नसलेल्या या तिघांनी थेट हत्याराने दमदाटीचा प्रयत्न केला; पण येथे जमलेल्या जमावाने तिघांना ठोकून काढत दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले. पकडलेल्या दोघांनी अंगावर प्रसिद्ध वाहनांचे लोगो, काही शुभचिन्हे अंगावर गोंदली होती. खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर पैसे मागितले असता ते न देणार्‍या या संशयितांनी टॅटूसाठी हजारो रुपये आणले कोठून, असा प्रश्‍न उपस्थित होतो.

गांजामुळे अनेक ठिकाणांची बदनामी

शहरातील प्रसिद्ध असणार्‍या हुतात्मा पार्क, टाऊन हॉल, गोळीबार मैदान, पंचगंगा नदी घाट, राजाराम बंधारा, रंकाळा तलाव, कोटीतीर्थ तलाव, निर्माण चौक, शाहू टोल नाका, उजळाईवाडी, राजाराम बंधारा, सरनोबतवाडी, टेंबलाई टेकडी, पुईखडी, चंबुखडी, शिंगणापूर बंधारा अशी ठिकाणे या गांजाची नशा करणार्‍यांमुळे बदनाम झाली आहे. रात्री याठिकाणी जाणे मुश्कील असले तरी दिवसाही येथे जाणे धोकादायक बनत आहे.

व्यापक मोहीम राबविणार : शैलेश बलकवडे

गांजाचे सेवन करणार्‍यांविरोधात कारवाईची धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच निर्जनस्थळी असे कृत्य करणार्‍यांवर लक्ष ठेवण्यासाठी संबंधित पोलिस ठाण्याला सूचना करण्यात आल्या आहेत. अशा नशाबाजांंविरोधात लवकरच व्यापक मोहीम राबविली जाईल.

Back to top button