कोल्हापूरमध्ये सर्वदूर पाऊस; धरण क्षेत्रांत मुसळधार, 39 बंधारे पाण्याखाली | पुढारी

कोल्हापूरमध्ये सर्वदूर पाऊस; धरण क्षेत्रांत मुसळधार, 39 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते, त्यातच जोरदार वार्‍यासह पावसाने हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला. धरण क्षेत्रांत दिवसभर मुसळधार पावसाचे प्रमाण जास्त होते. या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दिवसभरात जिल्ह्यात 39 बंधारे पाण्याखाली गेले असून, पंचगंगेचे पाणी दुसर्‍यांदा पात्राबाहेर पडले.

पावसामुळे करूळ घाटात दरड कोसळली असून, कोकणात जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. ही वाहतूक भुईबावडामार्गे वळविण्यात आली आहे. कुंभी धरणातून 420 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. गगनबावडा-कोल्हापूर रस्त्यावरील मांडुकली येथे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. बस्तवडे (ता. कागल) बंधार्‍यावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक आणूर (ता. कागल) मार्गावरून सुरू करण्यात आली आहे. गगनबावडा तालुक्यातील टेकवाडी रस्ता पाण्याखाली गेला आहे, त्यामुळे पायवाट सुरू आहे. तसेच काटे (ता. शाहूवाडी) येथील कासारी नदीचे पाणी वारणा मळी येथे आले आहे. त्यामुळे करंजफेण, अणुस्कुरा, मांजरे गावाकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे.

राधानगरी धरणातून सकाळपासून 1,432 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दिवसभरात 5 फुटांनी वाढ झाली आहे. कसबा बावडा येथील राजाराम बंधार्‍यावर मंगळवारी पाणी पातळी 27 फूट होती. बुधवारी रात्री आणि दिवसभर झालेल्या पावसामुळे ही पातळी सायंकाळी 7 वाजता 32 फूट 5 इंचांवर पोहोचली आहे.

जिल्ह्यात रविवारपासून पाऊस सुरू आहे. सोमवारी व मंगळवारी संततधार सुरू होती. दरम्यान, शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला असून 21, 22 व 23 जुलै हे तीन दिवशी ‘रेड अ‍ॅलर्ट’ जाहीर केला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, बुधवारी दिवसभर मुसळधार पाऊस न होता, संततधारच सुरू होती.

या पावसामुळे शेतात पाणी होऊ लागले असून, चिखल कोळपण, भाताच्या रोप लावणीच्या कामांना वेग आला आहे. नाचणी लावणीचे कामही जोरदार सुरू आहे. सोयाबीन, भुईमूग, तूर, उडीद, ज्वारी, बाजरी या पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस अत्यंत उपयुक्त आहे.

बुधवारी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 38.2 मि.मी. पाऊस झाला. सर्वात जास्त पाऊस गगनबावडा तालुक्यात 103.8 मि.मी. झाला. अन्य तालुक्यांतील पाऊस मि.मी. असा ः हातकणंगले 13.6, शिरोळ 6.3, पन्हाळा 39.8, शाहूवाडी 64.7, राधानगरी 77.9, करवीर 34.9, कागल 36.4, गडहिंग्लज 30.4, भुदरगड 48.1, आजरा 35.5, चंदगड 29.1 मि. मी.

धरणांतील जलसाठा (टीएमसी)
राधानगरी 5.18, दूधगंगा 13.48, तुळशी 2.11, वारणा 26.40, 13.48, कासारी 2.02, कडवी 1.56, कुंभी 2.08, पाटगाव 2.66 टीएमसी.

Back to top button