कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायचे आहेत की भिजत ठेवायचे आहेत? निर्णय न घेणे प्रशासनात चुकीचे आहे. असलेले अधिकार वापरणार नसाल तर त्याचा काय उपयोग, असा सवाल करत पालकमंत्री सतेज पाटील यांनी महापालिका अधिकार्यांना पार्किंग आरक्षणाच्या जागेवरून सुनावले. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी बैठक घेतली.
कोल्हापूर शहरातील पार्किंग स्पॉटबाबत शुक्रवारी पाटील यांनी बैठक घेतली होती. या बैठकीत शहरातील 15 स्पॉटचे क्रिडाईच्या वतीने सादरीकरण करण्यात आले होते. यापैकी आरक्षण असलेल्या जागा ताब्यात घेण्याबाबत तीन जागाधारकांसमवेत अधिकार्यांची आज बैठक घेण्यात आली.
पद्मा टॉकीज व शाहू टॉकीज या मार्गावरील पार्किंगसाठी आरक्षित केलेली चार हजार चौरस फूट जागा परत द्यावी, अशी मागणी जागामालकांनी केली. 1990 साली हे आरक्षण आपण रद्द केेले होते. 1999 साली विकास आराखड्यात पुन्हा ते टाकण्यात आले. हा अन्यायच असल्याच्या भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या. याबाबत तीन पर्याय सुचवण्यात आले. त्याबाबत चर्चा करून पुढील बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
चित्रदुर्ग मठ येथील जागा 40 वर्षांपूर्वी आरक्षित केली आहे. मात्र, ही जागा महापालिका आता परत घ्या, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. जागाही परत देत नाही, तिचा वापरही करत नाही. त्यात काही करण्यासाठी गेले तर फौजदारी कारवाईची नोटीस दिली जात असल्याचे शशिकांत पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. क्रिडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी गेल्या 40 वर्षांत महापालिकेने या जागेत काहीही केले नसल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर याबाबतची सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी झाल्यानंतर बैठक घेऊ, असे पाटील यांनी स्पष्ट करत न्यायालयात निर्णय झाल्यानंतर त्यांची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल केला.
कुणीतरी जबाबदारी घ्यायला हवी. आरक्षण टाकायचे, नंतर नाही म्हणायचे हे कसे चालेल, कोणताही प्रश्न टांगता ठेवायचा. पण त्यावर निर्णय घ्यायचा नाही, असा प्रकार जास्त सुरू असतो, अशा शब्दांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, नगरअभियंता नेत्रदीप सरनोबत आदी उपस्थित होते.