राष्ट्रीय पर्यटन दिन विशेष : पर्यटन क्षेत्रात अमर्याद संधी; जिल्हाधिकारी रेखावार यांचे प्रतिपादन - पुढारी

राष्ट्रीय पर्यटन दिन विशेष : पर्यटन क्षेत्रात अमर्याद संधी; जिल्हाधिकारी रेखावार यांचे प्रतिपादन

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

स्पर्धात्मक युगात अर्थार्जनाच्या साधनात बदल होत असताना पर्यटनाकडे बघण्याचा द़ृष्टिकोन विकसित होत आहे. पर्यटन क्षेत्रामध्ये असलेल्या अमर्याद संधींचा युवकांनी लाभ घेतला पाहिजे. त्यासाठी विपणन व्यवस्थापनाची जोड अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.

दैनिक ‘पुढारी’ संचलित प्रयोग सोशल फाऊंडेशन व केआयटी (आय.एम.ई.आर) यांच्या वतीने ‘राष्ट्रीय पर्यटन दिन’ व देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘पर्यटन विकास व विपणन व्यवस्थापन’ या विषयावरील ऑनलाईन चर्चासत्रात त्यांनी मार्गदर्शन केले. सोबत स्वातंत्र्यसैनिक वसंतराव माने, विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) विशाल माळी, कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त रविकांत आडसूळ, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर चर्चासत्रात सहभागी झाले होते. उपक्रमास कोल्हापूर, सांगली, सातारा येथील मॅनेजमेंट कॉलेजच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष ‘केआयटी’चे संचालक सुजय खाडिलकर यांनी प्रस्तावना केली.

यावेळी जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, शाहूनगरी कोल्हापुरात धार्मिक, सांस्कृतिक, निसर्ग पर्यटनाबरोबरच शैक्षणिक, औद्योगिक, साहसी खेळ, हस्तकला, खाद्य अशा विविध क्षेत्रांत अनेक संधी उपलब्ध आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून जगभर पोहोचता येत असून वारसा जोपासण्याचे महत्त्वाचे कार्य होत आहे.

स्वातंत्र्यसैनिक माने म्हणाले, ब्रिटिशपूर्व काळापासून भारत पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. जागतिक महासत्ता बनत असलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन क्षेत्राचा मोलाचा वाटा आहे. माळी म्हणाले, वन्यजीवांच्या अस्तित्वामुळे समृद्ध असलेल्या अभयारण्यांकडे पर्यटकांचा ओढा आहे. यामुळे निर्माण होणार्‍या व्यवसायाचा लाभ स्थानिकांनी घ्यावा. आडसूळ म्हणाले, शहर विकास आराखडा अंमलबजावणी करत असताना पर्यटनवृद्धीचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे. नागेशकर म्हणाले, हॉटेल व्यवसाय पर्यटनास पूरक आहे. उत्कृष्ट गुणवत्ता व सेवा, ग्राहकांचे समाधान यावर यश अवलंबून आहे.

चर्चसत्राच्या अखेरीस विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन मान्यवरांकडून करण्यात आले. संयोजन विभागप्रमुख रंजना चव्हाण, किरण पोळ, रणजित भोसले यांनी केले. सूत्रसंचालन विक्रम रेपे तर आभार प्रवीण जाधव यांनी मानले.

जिल्हाधिकार्‍यांकडून दै. ‘पुढारी’चे अभिनंदन

शाहूनगरी कोल्हापूरला विविधतेने परिपूर्ण असा मोठा वारसा लाभला आहे. त्याच्या जतन, संवर्धन व संरक्षणासाठी दै. ‘पुढारी’ – प्रयोग सोशल फाऊंडेशनतर्फे राबवण्यात येणारे सातत्यपूर्ण उपक्रम तसेच माहितीपूर्ण चित्रफितींबद्दल जिल्हाधिकारी रेखावार यांनी आवर्जून अभिनंदन केले. युवा पिढीचा उपक्रमातील उत्स्फूर्त सहभाग पर्यटनवृद्धीसाठी सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button