

कोल्हापूर ; दिलीप भिसे : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे श्रद्धास्थान आणि पुरोगामी, सामाजिक चळवळीचे अधिष्ठान लाभलेल्या करवीर नगरीसह जिल्ह्यात स्त्री भ्रूणहत्या वाढत्या घटना काळजावर घाव घालणार्या आहेत.
दहा वर्षांत गर्भलिंग निदान तपासणी सेंटरवरील छापे, उच्चशिक्षित, पांढरपेशींचा सहभाग, पैशाच्या लोभाने एजंटांची साखळी आणि उमलण्यापूर्वीच कळ्यांच्या अगणित हत्यांमुळे पुरोगामी जिल्ह्याच्या वैभवाला कलंक लावणार्या या घटना आहेत.
संपूर्ण राज्याला हादरवून सोडणार्या बीड जिल्ह्यातील स्त्री भ्रूणहत्या प्रकरणानंतर अलीकडच्या काळात शहरासह जिल्ह्यात एकापाठोपाठ एक चव्हाट्यावर येणार्या धक्कादायक गर्भलिंग निदान सेंटर आणि स्त्री भ्रूणहत्येच्या वाढत्या घटना प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगणार्या आहेत.
शाहूपुरीत व्हीनस कॉर्नरजवळील डॉक्टर दाम्पत्यास अटक, धामोड (ता. राधानगरी) येथील सेंटरवरील छापा, दारवाड ( भुदरगड) येथील तिघांना अटक, सोनोग्राफी मशिन पुरवणार्या कासेगाव (सांगली) येथील डॉक्टरांवर राजवाडा पोलिसांनी केलेली कारवाई, सिरसे (राधानगरी) येथील तरुण जेरबंद, कसबा वाळवे येथील एजंटास झालेली अटक, इस्लामपुरातील डॉक्टरांवरील कारवाईमुळे जिल्हा हादरला होता.
शहर, जिल्ह्यातील बेकायदा गर्भलिंग निदान सेंटर आणि स्त्री भ्रूणहत्या सत्राविरोधी 14 महिला संघटनांनी एकजूट करून पैशाला चटावलेल्या समाजकंटकांवरील कारवाईसाठी यंत्रणांवर दबाव आणला. त्यामुळे अनिष्ठ घटनांचा काही काळ कडेलोट झाला होता. मात्र, परिते-कुरूकली (ता. करवीर) येथील गर्भलिंग निदान सेंटरचा भांडाफोड होवून रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने करवीरवाशीयात पुन्हा संतापाची लाट उसळली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत 45 पेक्षा अधिक महिलांची तपासणी झाल्याने गर्भात वाढणार्या कळ्यांचे काय झाले असेल ? असा संतप्त सवाल विचारला जात आहे. तपासात निष्पन्न होणार्या सर्वच घटनांचा सोक्षमोक्ष लावून संशयित टोळीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्त्रीभ्रूण हत्या विरोधी कृती समितीने केली आहे.
गर्भलिंग निदानप्रकरणी संशयित राणी कांबळे हिला 2017 मध्ये कागलमध्ये अटक झाली होती.
शिवाय पोलिसांनी जप्त केलेले सोनोग्राफी मशिनही संशयितानी 2017 मध्ये सनी उर्फ गजेंद्र बापू कुसाळे याच्याकडून खरेदी केले होते.
कुसाळेला यापुर्वी राजवाडा पोलिसांनी अटक केली होती.
2017 पासून सोनोग्राफी मशिनचा कोठे आणि कितीवेळा वापर झाला? याचा छडा लावण्याची गरज आहे.
कोल्हापूरपासून अवघ्या 23 किलोमिटर अंतरावर असलेल्या परिते येथील काळेधंदे पोलिस यंत्रणांच्या निदर्शनास आले नव्हते का ? चिरीमिरीसाठी समाजकंटकांना पाठीशी घालणार्यांचाही पोलिस अधीक्षकांनी छडा लावून सहआरोपी करावे, अशीही संतप्त मागणी महिलांतून होवू लागली आहे.
वादग्रस्त सेंटरचा पर्दाफाश झाल्यानंतर आश्रयदात्या एका पोलिस कॉन्स्टेबलच्या नावाची उघड चर्चा सुरू झाली आहे.
नेमके सत्य काय ? याचाही उलगडा होणे गरजेचे आहे.