देश स्वातंत्र्यासाठी सर्वस्व त्याग केले पाहिजे! | पुढारी

देश स्वातंत्र्यासाठी सर्वस्व त्याग केले पाहिजे!

कोल्हापूर ; सागर यादव : ‘देश स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व त्याग केले पाहिजे…’ अशा आशयाचा संदेश आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 90 वर्षांपूर्वी दिला होता. दि. 25 डिसेंबर 1931 रोजी जानुगडेवाडी (ता. पाटण) येथील कॅप्टन व्ही. टी. तथा विष्णू तात्यासाहेब जानुगडे यांच्या संदेश वहीवर नेताजींनी आपल्या स्वाक्षरीसह हा संदेश लिहिला होता. या ऐतिहासिक ठेव्याचे जतन जानुगडे यांचे नातू, कोल्हापूर महानगरपालिकेचे अभियंता सुरेश पाटील यांनी केले आहे. आज 23 डिसेंबर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती, या निमित्त सुभाषबाबू यांच्या संदर्भातील अस्सल ऐतिहासिक दस्तऐवजावर टाकलेला प्रकाश झोत.

स्वातंत्र्यलढ्याच्या धामधुमीच्या काळात महाराष्ट्राच्या दौर्‍यावर असताना नेताजी सुभाषचंद्र बोस दि. 25 डिसेंबर 1931 रोजी कराडात मुक्‍कामाला थांबले होते. नेताजींच्या आवाहनास प्रतिसाद देत परिसरातील तरुण मंडळी राष्ट्रीय भावनेने त्यांच्या भेटीसाठी जमली होती. 20 मैलांचा पायी प्रवास करून जानुगडेवाडी येथील विष्णू जानुगडे व त्यांचे मित्र मंडळी तेथे गेले. कृष्णा काठच्या सभेनंतर नेताजींना प्रत्यक्ष पाहून त्यांचा संदेश घेण्यासाठी पांडूअण्णा शिराळकर यांच्या घरी लोक जमले; पण नेताजींनी संदेशाचे नंतर पाहू असे सांगताच अनेकजण निघून गेले.

मात्र, विष्णू जानुगडे तेथेच उभे राहून संदेश घेऊनच जाण्याचा निर्धार केला. नेताजींच्या हे लक्षात येताच त्यांनी जानुगडे यांच्या हातातील वही घेऊन त्यावर ‘Sacrifice and self effacement contribute the price we have to pay for freedom’ असा संदेश लिहून त्याखाली स्वाक्षरी केली. इतकेच नव्हे, तर नेताजींनी जानुगडे यांना या संदेशाप्रमाणे आचरण कर, पुढे सैन्यात गुप्तपणे दाखल हो. एक क्षण असा येईल की, तेव्हा देशाला तुझी अत्यंत जरुरी भासेल’ अशा शब्दांत संजीवन मंत्र दिला.

नेताजींच्या मंत्राने प्रेरित झालेल्या जानुगडे यांनी 1935 ला शिक्षण पूर्ण होताच सैन्य दलात प्रवेश केला. दि. 17 जुलै 1935 ला बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये पुण्यास फिटर ट्रेनी म्हणून दाखल भरती झाले. अवघ्या सहा वर्षांच्या कालावधीत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी फिटर-शिपाई, व्हाईस कमांडिंग ऑफिसर (व्हीसीओ) असा यशस्वी प्रवास केला.

15 फेब्रुवारीला सिंगापूरचा पाडाव झाल्यानंतर तेथेच नेताजींना पुन्हा भेटण्याचे भाग्य जानुगडे यांना मिळाले. त्यावेळी त्यांनी कराडला दिलेल्या संदेशाची आठवण करून देताच नेताजींनी त्यांची पाठ थोपटली. आझाद हिंद सेनेमधून 27 मे 1946 रोजी लाल किल्‍ला दिल्‍लीतून कॅ. जानुगडे निवृत्त झाले. निवृत्तीनंतर समाजासाठी काही तरी करण्याच्या उद्देशाने रेशीम उत्पादनाचे शिक्षण घेऊन लघू उद्योगासाठी प्रयत्न केले. दि. 14 ऑगस्ट 1982 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे चिरंजीव वसंतराव जानुगडे यांनी जपून ठेवलेली संदेश वही सुरेश पाटील यांच्याकडे आली.

Back to top button