godsakhar sugar factory : कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' साखर कारखान्याच्या १२ संचालकांनी दिला तडकाफडकी राजीनामा - पुढारी

godsakhar sugar factory : कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' साखर कारखान्याच्या १२ संचालकांनी दिला तडकाफडकी राजीनामा

गडहिंग्लज ; पुढारी वृत्तसेवा : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या गेल्या दोन महिन्यांच्या राजकीय घडामोडीमध्ये आज नवे वादळ निर्माण झाले आहे. चेअरमन अ‍ॅड.श्रीपतराव शिंदे यांच्या बेजबाबदार व मनमानी कारभाराला कंटाळून १२ संचालकांनी आपण राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले. प्रादेशिक सहसंचालकाकडे आपले सामूहीक राजीनामे सादर करून मंजूर करून घेतले. (godsakhar sugar factory)

या घडामोडींमुळे गोडसाखरच्या राजकारणामध्ये वेगळयाच घडामोडी होणार असून १२ संचालकांच्या या निर्णयामुळे कारखान्याचे संचालक मंडळच बरखास्त होणार असल्याचे तज्ञांचे मत आहे.

गोडसाखरचे डॉ. प्रकाश शहापूरकर, प्रकाश चव्हाण, सतीश पाटील, प्रकाश पताडे, विद्याधर गुरबे, दीपक जाधव, किरण पाटील, अनंत कुलकर्णी, सुभाष शिंदे, सदानंद हत्तरकी, जयश्री पाटील, क्रांतीदेवी कुराडे या १८ पैकी १२ संचालकांनी आज प्रादेशिक सहसंचालकाना सामूहीक राजीनामे देताना चेअरमनांच्या कारभारावर पत्रातून नाराजी व्यक्त केली.

यामध्ये कारखान्याचे चेअरमन हे बेजबाबदारपणे तसेच मनमानीपध्दतीने कारभार करीत असून संचालक मंडळाला विश्वासात न घेता रितसर सभा न बोलवता साखर विक्री करण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबत संचालक मंडळाला कोणतीही कल्पना न देता साखर विक्री टेंडरची प्रक्रीया पूर्ण केली आहे. (godsakhar sugar factory)

या सर्वाला कंटाळून आम्ही सामूहीक राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले. शनिवारी होणारी साखर विक्री तातडीने थांबवावी अशी मागणी केली आहे. यामुळे आता कारखान्याचे आगामी काळातील सर्वच निर्णय थांबणार आहेत.

Back to top button