sugar factories : साखरेला क्विंटलमागे १५५ रुपये जादा कर्ज | पुढारी

sugar factories : साखरेला क्विंटलमागे १५५ रुपये जादा कर्ज

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : साखर कारखान्यांचा ( sugar factories ) साखर कर्जावरील दुरावा दहा टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना प्रतिक्विंटल 155 रुपये जादाची रक्कम एफआरपी देण्यासाठी उपलब्ध होणार आहे. यंदा साखरेचे उत्पादन विक्रमी होण्याचा अंदाज असून, सुमारे पाच हजार कोटी रुपयांपर्यंत साखर तारणावर कर्ज दिले जाणार आहे.

राज्य सहकारी बँकेच्या एकूण कर्जपुरवठ्यापैकी 40 टक्के कर्जपुरवठा हा साखर कारखान्यांना ( sugar factories ) केला आहे. यंदा एफआरपीची रक्कम तीन हजार रुपयांच्या घरात असल्याने हा निर्णय राज्य बँकेने घेतला आहे.

यापूर्वी साखर उत्पादनाच्या 85 टक्के तारणावर कर्ज मिळत होते. ही रक्कम एफआरपीपोटी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना दिली जाते. 15 टक्क्यांचा दुरावा कर्ज देताना ठेवला जातो. तो दुरावा आता 10 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. त्यामुळे एकूण साखर उत्पादनाच्या 90 टक्के साखर तारणावर कारखान्यांना कर्ज मिळेल. ( sugar factories )

सध्या साखरेच्या विक्रीचा दर 3 हजार 100 रुपये क्विंटल एवढी किंमत निश्चित करण्यात आली आहे. त्यावर 85 टक्के तारणप्रमाणे प्रतिक्विंटल 2 हजार 635 रुपये कर्ज कारखान्याला दिले जाते. आता 85 टक्क्यांचे तारण 90 टक्क्यांवर आणल्यामुळे प्रतिक्विंटल 155 रुपये जादा रक्कम एफआरपीसाठी उपलब्ध होणार आहे. आता क्विंटलमागे 2 हजार 790 रुपये राज्य बँकेकडून कारखान्यांना उपलब्ध होतील. ( sugar factories )

गेल्या हंगामात 4 हजार 700 कोटी रुपये कर्ज साखर तारणापोटी राज्य बँकेने दिले होते. यंदाच्या हंगामात 125 लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. गेल्यावर्षीचा 48 लाख मेट्रिक टन साखरसाठा शिल्लक आहे. यंदा सुमारे 5 हजार कोटी रुपये कारखान्यांना कर्जापोटी उपलब्ध होणार आहेत.

‘या’ कारखान्यांना मिळणार लाभ

ज्या साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा 10 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे व जे साखर कारखाने राज्य बँकेच्या कर्जाचे सुरुवातीपासून आजअखेर नियमित परतफेड करीत आहेत अशा कारखान्यांचा यामध्ये प्रामुख्याने विचार करण्याचा निर्णय राज्य बँकेच्या प्रशासक सभेने घेतला आहे.

साखरेच्या किमान विक्रीची किंमत केंद्र सरकारने 3 हजार 100 रुपये ठरविली आहे. मध्यंतरी साखर 33 ते 34 रुपये किलो दराने विकली जात होती. मात्र, आता साधारणपणे 31 रुपये आणि त्या आसपासच्या दराने विकली जात आहे. या दरात एफआरपी एकरकमी देणे ही तारेवरची कसरत आहे. राज्य बँकेच्या निर्णयाने कारखान्यांना मदत होणार आहे.
– विजय औताडे, साखर उद्योगातील तज्ज्ञ

Back to top button