शिरोळ; शरद काळे : काळ्या बाजारात रेशनवरील गहू व तांदूळ विक्री होत असलेल्या प्रकरणाला वाचा फुटल्यानंतर आता कोव्हिड काळात राज्य सरकार व केंद्र सरकारने प्रति कुटुंबाला दिलेल्या मोफतच्या धान्याची संगनमताने परस्पर विल्हेवाट लावून अनेक गरीब कुटुंबांची वाताहत केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. मोफतचे धान्य शिधापत्रिका धारकांना विकतचे धान्य म्हणून वाटप केल्याचे लाभार्थी सांगत आहेत.
विशेष म्हणजे काहींनी असंख्य कार्डधारक सदस्यांची सही घेऊन आपले धान्य आले नसल्याचे सांगितले. तर काहींनी जनसेवा म्हणून स्वतःच्या पैशातून साखर विकत आणून वाटप केल्याची जाहीर वल्गना सुरू केली. तालुका पुरवठा विभागाने टेम्पोमध्ये ज्वारी असल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे. तर दुकानदारांकडे नियमापेक्षा जादा 71 पोती मिळून आली. हे शासनाचे धान्य त्यांनी बाहेरून विकत आणले की, तालुका पुरवठा विभागाने मोफत दिले? शिल्लक धान्य लाभार्थ्यांचे नसल्यामुळे या धान्याची काळ्या बाजारात विक्री हा एकच पर्याय खुला होत आहे.
असे असेल तर दुकानासमोर लावलेल्या टेम्पोत ज्वारी आली कुठून, असा सवाल करून महिन्याला पुरवठा निरीक्षकाकडून दुकानांची तपासणी व पहहणी होत असताना ही पोती का निदर्शनास आली नाहीत? की, याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करण्यात आली याचा तपास जिल्हा पातळीवरून करावा, अशी मागणी संभाजी बि—गेड संघटनेचे अध्यक्ष अमोल संकपाळ, जावेद बालेभाई, अजित कोळी यांनी केली आहे.जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी लाभार्थ्यांना दिले जाणारे धान्य गोडाऊन, वितरण विभागाचा साठा व वाटप केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
पुरवठा विभाग अपडेट करावा
पुरवठा विभागाने रजिस्टर, परमिट व चलन फाईल, साठा रजिस्टर, कॅश मेमो विक्री, तक्रार, अभिप्राय असे स्वतंत्र रजिस्टर, धान्याचे नमुने, वजनमाप पडताळणी प्रमाणपत्र, शॉप अॅक्ट लायसन, रास्त भाव दुकानदार स्वतः परवानाधारक आहे काय किंवा अधिकार पत्र घेतले आहे काय, धान्याच्या खाली तळवट, धान्याची थप्पी, अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अनुसूचित जाती जमाती, दिव्यांग लाभार्थी याबाबतची माहिती अपडेट केली आहे का याची चौकशी होणे आवश्यक आहे.
जयसिंगपुरातील तीन रेशन दुकानांचे परवाने रद्द
जयसिंगपूर ; पुढारी वृत्तसेवा : येथील जयसिंगपूर विकास सोसायटीच्या रेशन धान्य दुकान क्रमांक 2, 3 व 5 या तीन दुकानांत बेकायदेशीर धान्य बाहेर नेऊन काळा बाजार सुरू असल्याचा प्रकार कोल्हापूर येथील परिवर्तन संघटनेच्या पदाधिकार्यांनी उघड पाडला होता. या दुकानांवर कारवाई झाली पाहिजे अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला होता. अखेर मंगळवारी या तिन्ही रेशन धान्य दुकानांची अनामत रक्कम जप्त करून परवाने रद्द केल्याची कारवाई जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील जयसिंगपूर विकास सोसायटीच्या रेशन धान्य दुकान क्रमांक 2, 3, 5 या तीन दुकानांतून बोलेरो टेम्पोतून रेशन धान्याची पोती बाहेर विकण्यासाठी जात असताना त्याचे व्हिडीओ चित्रीकरण कोल्हापूर येथील परिवर्तन संघटनेने केले होते. याबाबतचे सगळे पुरावे तहसीलदार व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे देऊन तातडीने दुकानांची तपासणी करण्याची मागणी परिर्वतन संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी केली होती. या तपासात गहू 29.79 क्विंटल व तांदूळ 41.11 क्विंटल इतका साठा अतिरिक्त सापडला होता. त्यानंतर प्रशासनाने टेम्पोचालक व सेल्समन जितेंद्र गुप्ता यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला होता.
या सर्व कारभाराचा अहवाल तहसीलदार यांनी जिल्हा पुरवठा अधिकार्यांकडे सादर केला होता. शिवाय हे धान्य जांभळी येथील आटा चक्की कंपनीत गेले केसे यासह विविध गोष्टी पुढे आल्या होत्या. या दुकानांचे परवाने रद्द करावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी मंगळवारी तिन्ही रेशन धान्य दुकानांची अनामत रक्कम जप्त करून परवाने रद्द केले.