कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार बरसला | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार बरसला

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला. चार-पाच दिवसांच्या उघडिपी नंतर सोमवारी जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 32 मि.मी. पाऊस झाला.

सर्वात जास्त गगनबावडा तालुक्यात 97.6 मि.मी. पाऊस झाला. कोमेजून चाललेल्या पिकांना पावसामुळे जीवदान मिळाले असून, शेतीच्या आंंतरमशागतीच्या कामांना वेग येणार आहे. तसेच अंतिम टप्प्यात असलेल्या भात लावणीच्या कामांनाही गती मिळणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. एकीकडे हवामानखाते पाऊस पडणार, असा अंदाज वारंवार वर्तवत होते, तर दुसर्‍या बाजूला पाऊस हुलकावणी देत होता. कधी ऊन, तर कधी ढगाळ वातावरण अशी परिस्थिती होती. पहिल्या पावसामुळे तरारून आलेल्या पिकांची पाण्याअभावी वाढ खुंटत चालली होती. त्यामुळे शेतकर्‍यांचा जीव टांगणीला लागला होता. तरण्या पावसाचे नक्षत्र संपल्यानंतर रविवारी म्हातार्‍या पावसाचे नक्षत्र सुरू झाले आहे.

चार ते पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी रात्री जिल्ह्यात पावसाला दमदार प्रारंभ झाला. सोमवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या तसेच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील 14 बंधारे पाण्याखाली गेले असून, कसबा बावडा येथे पंचगंगा नदीची पाण्याची पातळी 23 फूट इतकी आहे. राधानगरी धरणातून 1,350 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

गेल्या 24 तासांतील पावसाची आकडेवारी मि.मी.मध्ये अशी : हातकणंगले – 14.1, शिरोळ – 13.8 पन्हाळा – 22.1, शाहूवाडी – 26.7, राधानगरी – 36, करवीर – 26.2, कागल – 27.8, गडहिंग्लज – 49.7, भुदरगड – 57.7, आजरा -49.5 व चंदगड – 30.7 मि.मी.

धरणांतील पाणीसाठा असा (द.ल.घ.मी.मध्ये) : तुळशी 55.42, वारणा 693.30, दूधगंगा 342.55, कासारी 51.15, कडवी 37.67, कुंभी 54.67, पाटगाव 69.87, चिकोत्रा 24.92, चित्री 36.27, जंगमहट्टी 16.03, घटप्रभा 4417, जांबरे 23.23, आंबेओहोळ 18.63 द.ल.घ.मी. तसेच कोदे प्रकल्प पूर्णक्षमतेने भरला आहे.

Back to top button