चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्हीही हिशेब चुकता करू | पुढारी

चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्हीही हिशेब चुकता करू

वारणानगर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा बँक अध्यक्ष निवडीबाबतचे सर्वाधिकार आम्ही आमदार विनय कोरे यांना दिले आहेत. ते जी भूमिका घेतील, ती भाजपसह मित्रपक्षांना मान्य असेल. आम्ही काही करेक्ट कार्यक्रमसारखा शब्द वापरत नाही, पण आम्ही सर्वजण हिशेब चुकता करणारे आहोत, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी रात्री वारणानगर येथे आमदार डॉ. विनय कोरे यांची केडीसीसी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला. यावेळी तिळगूळ देऊन संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्यानंतर आमदार पाटील बोलत होते.

दहापेक्षा अधिक जागा आल्या असत्या

पाटील म्हणाले, आमदार प्रकाश आवाडे यांचा तसेच प्रक्रिया गट, शाहूवाडी, आजरा संस्था गटात आमच्या उमेदवारांना धोका देऊन केलेला पराभव आमच्यासाठी धक्‍कादायक आहे. जिल्हा बँकेत सात जागा निवडून आणण्याची ताकद भाजपसह मित्रपक्ष जनसुराज्य, आ. आवाडे, महाडिक गट यांच्यात आहे. शिवसेनेला सोबत घेऊन स्वतंत्र पॅनेल केले असते तर जिल्हा बँकेत दहापेक्षा अधिक जागा आम्हाला मिळाल्या असत्या. मुंबई बँकेत ज्या प्रमाणे गठबंधन केल्यावर भाजपची सत्ता आली.

विरोधी पक्षांनी पुन्हा आघाडी करून एका मताने पराभव करून भाजपला सत्तेपासून बाजूला ठेवले तसा प्रयोग येथे देखील होऊ शकेल; परंतु सध्या आमचे संख्याबळ तीन आहे. त्यामुळे चार दिवसांत काही घडामोडी होऊन काय निर्णय घ्यायचा, हे आ. विनय कोरे ठरवतील. यावेळी जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम व जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने आदी उपस्थित होते.

सत्ताधारी गटाने आमचे उमेदवार पाडले

बँकेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सत्ताधारी गटासोबत आम्ही गेलो आणि याच सत्ताधारी गटाने आमचे उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न केले. ते आज यशस्वी झाले तरी याचे दीर्घकालीन परिणाम भोगावे लागतील, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

Back to top button