मुंबईसाठी लवकरच दररोज विमानसेवा | पुढारी

मुंबईसाठी लवकरच दररोज विमानसेवा

कोल्हापूर ; अनिल देशमुख : कोल्हापूर-मुंबई मार्गावर लवकरच दररोज विमानसेवा सुरू होणार आहे. फेब्रुवारीपासून दररोज कोल्हापुरातून मुंबईसाठी विमानाचे उड्डाण होईल अशी तयारी कंपनीने सुरू केली आहे.

कोल्हापूर-हैदराबाद, बंगळूर आणि तिरुपती मार्गावरील सेवा सुरळीत सुरू असताना गेल्या वर्षींपासून कोल्हापूर-मुंबई मार्गावरील विमानेवा मात्र विस्कळीतच होती. अचानक फ्लाईटस् रद्द होण्याचे प्रकारही वारंवार घडत होते. याचा मोठा फटका प्रवाशांना बसत होता. यामुळे ही सेवा बंद करून नव्या कंपनीने या मार्गावर सेवा सुरू करावी, अशी मागणी जोर धरत होती.

या सर्व पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर-मुंबई मार्गावरील विमानसेवा 17 जानेवारीपासून पुन्हा सुरू होत आहे. यापूर्वी आठवड्यातून मंगळवार, बुधवार आणि गुरुवार ही तीन दिवस सुरू असलेली सेवा आता सोमवार, बुधवार आणि शुक्रवार अशी सुरू राहणार आहे.

ही सेवा दररोज सुरू करण्यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सध्या अहमदाबाद बेसमुळे तीन दिवस असणारी ही सेवा हैदराबाद बेसद्वारे सात दिवस केली जाणार आहे. फेब्रुवारीपर्यंत ही सेवा दररोज सुरू होईल, असे सांगण्यात आले. लवकरच कोल्हापूर-मुंबई मार्गावर कार्गो सेवा सुरू केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

कोल्हापूर-मुंबई मार्गावर विमानसेवा विस्तारण्याची गरज असताना सुरू असलेली सेवा वारंवार खंडीत होत होती. पुन्हा या मार्गावर विमानसेवा सुरू होत आहे. कंपनीने चांगली आणि विनाखंड सेवा द्यावी, अन्यथा अन्य दोन कंपन्यांशी या मार्गावर विमानसेवा सुरू करण्याबाबत चर्चा झालेली आहे. ती प्रक्रिया पुढे नेली जाईल.
सतेज पाटील, पालकमंत्री

Back to top button