शैलेश बलकवडे म्हणाले, पोलिस दलाचा समाजकंटकांवर वचक | पुढारी

शैलेश बलकवडे म्हणाले, पोलिस दलाचा समाजकंटकांवर वचक

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : नैसर्गिक आपत्तीसह महामारीला रोखण्यासाठी प्रभावी उपाय, शांतता- सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न होत असताना संघटित टोळ्यांवर कायद्याचा जरब ठेवताना सरत्या वर्षात कोल्हापूर पोलिस दलाला तारेवरची कसरत करावी लागली. आव्हानात्मक स्थिती असली तरी पोलिस दलाची कामगिरी निश्‍चितच सरस ठरली आहे, असे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मंगळवारी सांगितले.

2020 तुलनेत 2021 मध्ये 1 हजार 415 गुन्ह्यांची वाढ झाली असली तरी उघडकीला आलेल्या गुन्ह्यांचे प्रमाण सरासरी 75 टक्क्यांवर आहे. मात्र, सरत्या वर्षात संघटित टोळ्यांवरील मोका, तडीपार चोरट्यांना बेड्या ठोकून दीड कोटीच्या हस्तगत दागिन्यांसह काळेधंदेवाले. तस्करांवरील कारवाई समाजकंटकांना धडकी भरविणारी आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अनेक गुन्ह्यांत सराईतांना कोठडीत बंद केले आहे, असेही ते म्हणाले.

लॉकडाऊन काळात शहर, जिल्ह्यात गुन्ह्यांचा टक्‍का वाढला असला तरी समाजकंटकांवरील कारवाईत ढिलाई होऊ दिली नाही, असे स्पष्ट करून शैलेश बलकवडे म्हणाले, सरत्या वर्षात 8 टोळ्यांतील 60 गुन्हेगारांना बेड्या ठोकून त्यांच्यावर ‘मोका’ अंतर्गत कारवाई झाली आहे. कायदा कलम 55, 56 व 57 अंतर्गत 81 सराईतांना तडीपार करण्यात आले आहे. 2021 मध्ये खुनाच्या 50 घटना घडल्या, त्यापैकी 45 गुन्ह्यांचा छडा लावून मारेकर्‍यांना जेरबंद करण्यात आले आहे. खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यांपैकी 99 टक्के गुन्हे उघड झाले आहेत. दरोड्याच्या बाराही गुन्ह्यांचा छडा लागला आहे.

घरफोडी, चोरीतील टोळ्यांचा पर्दाफाश करून 318 पैकी 93 गुन्हे उघड झाले आहेत. जुगारप्रकरणी 1010 दाखल गुन्ह्यांत 3 कोटी 68 लाख 15 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 3 कोटी 70 लाख 97 हजारांची दारू जप्‍त करून तस्करांना बेड्या ठोकण्यात आल्याचे ते म्हणाले.

दीड कोटीचे दागिने हस्तगत

शहर, जिल्ह्यात 102 घटनांमध्ये चोरट्याने सोन्या, चांदीचे दागिने लंपास केले असले तरी एलसीबीसह पोलिस ठाण्यांतर्गत डीबी पथकांनी 94 लाखांचे 274 ग्रॅम सोने, 977 ग्रॅम चांदी असे दीड कोटीचे दागिने चोरट्याकडून हस्तगत करण्यात आले आहे. अनैतिक मानवी व्यापाराला आळा घालण्यासाठी 2020 मध्ये 4 तर 2021 मध्ये 13 अड्ड्यांवर छापे टाकून रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

41 जणांना बेड्या, 30 शस्त्रे, काडतुसे हस्तगत

शस्त्रांच्या धाकावर दहशत माजविणार्‍या गुन्हेगारांसह शस्त्र तस्करांवर गतवर्षात प्रभावी कामगिरी बजावण्यात आली आहे. वर्षात 23 गुन्हे दाखल करून 41 संशयितांना बेड्या ठोकण्यात आल्या. त्यांच्याकडून 30 पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, 46 जिवंत काडतुसे,2 पुंगळ्या, 6 छरे हस्तगत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वाहन चोरीप्रकरणी 708 गुन्ह्यांपैकी 329 गुन्हे उघड झाले आहेत.

सरत्या वर्षातील गुन्ह्यांचा तपशील कंसात वाढसंख्या

खून 50 ( 5), बलात्कार 178 (63) विनयभंग 349 (31), जबरी चोरी 125 (17), घरफोडी 318 (31), चोरी सर्व 1541 (661), दुचाकी चोरी 695 (251), इतर चोरी 833 ( 411), गर्दी, मारामारी 414 (61), प्राणघातक अपघात 388 (75), भाग 1 ते 5, 6309 (1415) जुगार 1010 (383).

Back to top button