कोडोली येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात दहा जखमी

कोडोली येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात दहा जखमी

कोडोली, पुढारी वृत्तसेवा : कोडोली येथे मंगळवारी पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात दहाजण जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या दोघांना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

सकाळी नऊच्या सुमारास कोडोली उपजिल्हा रुग्णालयाशेजारी रामचंद्र रघुनाथ पाटील (वय 60) यांच्यावर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करत उजव्या पिंढरीचे लचके तोडले. यावेळी जमावाने कुत्र्याला पळवून लावले. त्यानंतर कुत्र्याने रुग्णालयाच्या गेटसमोर उभ्या असलेल्या संजय नामदेव सिंहासने (62) यांच्या डाव्या पायाचा लचका तोडला. तसेच शामराव केकरे (45), उत्तम संकपाळ (27), बाबासाहेब रामचंद्र कांबळे (55), मनीस योना गायकवाड (30), विजय भगवान कांबळे (35), नामदेव कुडाळ (23), शिखर राठी (25), शामराव केकरे (45, सर्व रा. कोडोली, ता. पन्हाळा) या आठजणांवर हल्ला करून रक्तबंबाळ केले. अचानकपणे पिसाळलेल्या कुत्र्याने भरचौकात केलेल्या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली. तोपर्यंत या कुत्र्याने अंबाबाई मंदिरापाठीमागील गल्लीतून गाव ओढा गाठला.

जखमी नामदेव कुडाळसह दोघांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल केले आहे; तर रामचंद्र पाटील, संजय सिंहासने यांच्यावर कोडोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाकी सर्व जखमींवर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले. दरम्यान, या कुत्र्याने अन्य चार ते पाच कुत्र्यांचाही चावा घेऊन त्यांना जखमी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news