निष्ठेच्या दहीहंडीत ‘आठ’ थरांचा विक्रम

निष्ठेच्या दहीहंडीत ‘आठ’ थरांचा विक्रम
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : एकमेकांना आधार देणारे हात…. दहीहंडीकडे लागलेले उपस्थितांचे डोळे… एकावर एक रचले जाणारे थर… क्षणाक्षणाला वाढती उत्कंठा… अन् आठव्या थरांवर उभारून देवराज धनवडे (वय 14) या बालगोविंदाने दिलेली सलामी हा एक नवा विक्रम तासगावच्या शिवनेरी गोविंद पथकाने रचला. जिल्ह्यात आलेल्या पथकांपैकी असा विक्रम करणारे हे पहिलेच पथक ठरले. रात्री 9.45 वाजता सातव्या थरावरून शिवनेरी पथकाने दहीहंडी फोडत ठाकरे गटाच्या 1 लाख 11 हजारांच्या बक्षिसावर कब्जा केला.

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मिरजकर तिकटी चौकात निष्ठा दहीहंडीचे आयोजित करण्यात आले होते. सायंकाळी शिवसेना (ठाकरे गट) कट्टर शिवसैनिकांच्या हस्ते जिल्हाप्रमुख संजय पवार, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी यांच्या हस्ते तर राजू जाधव, धनाजी दळवी, शशिकांत बीडकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. मुख्य चौकात सुमारे 42 फुटांवर ही दहीहंडी बांधण्यात आली होती तर दोन मंचही उभे करण्यात आले होते. एका मंचावर सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होते.

मराठमोळा सांस्कृतिक कार्यक्रम

शिवसेनेच्या दहीहंडी कार्यक्रमात केडीसी अ‍ॅकॅडमीने मराठी पारंपरिक, लोककलांचे नृत्यविष्कार सादर केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील अनेक प्रसंग, शाहिरी यावरही या कलाकारांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

शिवनेरी पथक ठरले 'विक्रमवीर'

आठ वाजण्याच्या सुमारास तासगावच्या शिवनेरी गोविंद पथकाने पहिला प्रयत्न सुरू केला. या पथकाने पाहता पाहता आठ थरांची सलामी दिली. त्यांनी रचलेल्या या आठ थरांचा विक्रम जिल्ह्यात प्रथमच झाल्याचा दावा या पथकाने केला आहे. या सलामीसाठी त्यांना 11 हजारांचे रोख बक्षीस देण्यात आले.

40 गद्दारांना धडा…

शिवनेरी गोविंदा पथकाला दहीहंडी फोडण्याची संधी देण्यात आली. यावेळी ही उंची 42 फुटांवरून 40 फुटांवर आणण्याची सूचना संयोजकांनी केली. चाळीस हा गद्दारांचा आकडा असून तितक्यांच फुटांवरून निष्ठेची दहीहंडी फोडणार असल्याचे यावेळी संजय पवार व सुनील मोदी म्हणाले. रात्री 9.45 वाजता ही दहीहडी तासगावच्या शिवनेरी गोविंद पथकाने ही पथकाला शहीद जवान कै. दिगंबर उलपे यांच्या वीरमाता आनंदी उलपे यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. यावेळी विशाल देवकुळे, प्रज्ञा उत्तुरे, मंजित माने, सुहास डोंगरे, अवधूत साळोखे, दत्ताजी टिपुगडे, कमलाकर जगदाळे, सुशील भांदिगरे, राहुल माळी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news