राज्यातील नाट्यगृहांच्या सुधारणेचा पडदा कधी उघडणार?

राज्यातील नाट्यगृहांच्या सुधारणेचा पडदा कधी उघडणार?
Published on
Updated on

कोल्हापूर, सचिन टिपकुर्ले : मराठी रंगभूमी महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. रंगभूमीने आपल्याला अनेक हरहुन्नरी कलावंत दिले आहेत. या सर्वांनीच महाराष्ट्राची, मराठी रसिकांची आपल्या कलेच्या माध्यमातून मोठी सेवा केली आहे. पण ज्या रंगभूमीला नमन करून कलाकार जीव ओतून आपली कला सादर करतो, त्या नाट्यगृहांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. नाट्यगृहांचा ताबा असणारे स्थानिक प्रशासन नाट्य संस्थांकडे केवळ तीन तासांचा प्रयोग करणारे नाट्यकर्मी म्हणून पाहतात; पण त्यामागे रंगभूमीवरील कलाकार व पडद्यामागील कलाकारांचे अपार कष्ट नजरेआड करून चालणार नाही.

महाराष्ट्राच्या रसिकांनी आपल्या रंगभूमी परंपरेवर, नाट्य चळवळीवर भरभरून प्रेम केले आहे. मराठी रंगभूमी आणि मराठी रसिकजन, चोखंदळ नाट्यप्रेमी हे महाराष्ट्राचे संचित आहे. मराठी संस्कृतीचे वैभव आहे. मराठी मातीने कला क्षेत्रासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. या मातीत अन्य प्रांतातील, अन्य भाषांतील कला प्रकार-नाट्य प्रवाह रुजले, वाढले. त्यांनाही मराठी रसिकांनी आपलेसे केले आहे. जगभरात जिथे जातो तिथे आपण पाहतो की सगळ्यांना सामावून घेणारा असा आपला महाराष्ट्र आहे. हे आपले ऐश्वर्य आहे. विष्णुदास भावे ते आचार्य अत्रे अशा मांदियाळीने अनेक बदलांत, स्थित्यंतरात मराठी रंगभूमीची परंपरा समृद्ध केली आहे. आपल्या नाट्यकर्मींनीही या क्षेत्रावर भरभरून प्रेम केले आहे. आजही चित्रपटात कितीही काम केले तरी रंगभूमीवर काम केल्याचे खर्‍या अर्थाने समाधान मिळत असल्याचे अशोक सराफ, नाना पाटेकर , सयाजी शिंदे हे दिग्गज कलाकार सांगतात.

मराठी रंगभूमी खर्‍या अर्थाने 1843 मध्ये सीता स्वयंवर या नाटकाने मराठी रंगभूमी उदयास आली. नंतर पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, करमणूकप्रधान अशी विविध नाटके रंगभूमीवर आली आणि मायबाप प्रेक्षकांनी ती उचलून धरली. मात्र, गेल्या काही काळातील रंगभूमीची अवस्था पाहता शहरातील आणि निमशहरी भागातील नाट्यगृहांची अवस्था सुधारावी, अशी अपेक्षा रंगकर्मी व्यक्त करत आहेत. नाट्यगृहांची अवस्था अजूनही खराबच आहे.

प्रेक्षकांकडून 300 रुपयांपासून 700 ते 800 रुपये तिकीट आकारताना त्यांना काय सुविधा मिळतात, हा संशोधनाचा विषय आहे. खुर्च्यांचे हात मोडले आहेत, तर काही मोडकळीला आल्या आहेत. पावसाळ्यात अनेक ठिकाणी नाट्यगृहांची गळती कायम आहे. स्वच्छतागृहांची वाणवा, स्वच्छ पिण्याचे पाणी, नाट्यगृहांमधील स्वच्छता, वातानुकूलित सेवा मिळणे हा प्रेक्षकांचा अधिकार आहे.

काही नाट्यगृहांचे स्थानिक पातळीवर नूतनीकरण करण्यात आले आहे. पण काही दिवसांतच त्यांची दुरवस्था झाली आहे. मध्यंतरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाट्यगृहांच्या विस्तारीकरणासाठी आणि आधुनिकीकरणासाठी 10 कोटी रुपये देण्यात येतील, असे जाहीर केले. पण अजून त्याची अंमलबजावणी झालेली नाही. नाटक पाहणारा प्रेक्षक वर्ग आजही मोठा आहे. पण त्यांना नाट्यगृहात आणण्यासाठी शासनाने पाठबळ देण्याची गरज आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news