

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेल्या राधानगरी धरणामुळे आज 100 वर्षांनंतरही कोल्हापूरकरांना मुबलक पाणी उपलब्ध आहे. सह्याद्री डोंगर रांगेत जैवविविधता व वनस्पतीच्या जतन-संवर्धन-संरक्षणासाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या या अनमोल कार्याची माहिती युवापिढीपर्यंत पोहोचविण्यात आली.
निमित्तं होतं 'वारसा सप्ताहा' अंतर्गत आयोजित राधानगरी-दाजीपूर निसर्गभ्रमंती उपक्रमाचे. दै. 'पुढारी' प्रयोग सोशल फाऊंडेशन, वन्यजीव विभाग, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण महाविद्यालय (केएमसी कॉलेज) च्या राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांसाठी हा अनोखा उपक्रम घेण्यात आला. या अंतर्गत राधानगरी धरण, हत्ती महाल, दाजीपूर निसर्ग माहिती केंद्र, पडसाळी येथील जुगाई व उगवाई देवीची देवराई अशा विविध ठिकाणांना भेटी देऊन माहिती घेण्यात आली.
पर्यटन मार्गदर्शक कृष्णराव माळी यांनी विद्यार्थ्यांना इतिहास व पर्यावरणाविषयी मार्गदर्शन केले. पडसाळी गावचे सरपंच तानाजी पाटील यांनी देवराई संरक्षण मोहिमेची माहिती दिली. संयोजन प्रा. संजय कांबळे, प्रा. सचिन धुर्वे यांनी केले.
कसबा तारळे (ता. राधानगरी) येथील काका आठवले विद्यार्थी वसतिगृहाला भेट देऊन 40 वर्षांपासून सुरू असणार्या कार्याची माहिती घेण्यात आली. 'वसतिगृहाच्या माध्यमातून पडसाळी देवराईसह परिसराच्या पर्यटन विकासाचे कार्य हाती घेण्यात आले आहे. वसतिगृहाचे उपाध्यक्ष मारुती पाटील, व्यवस्थापक श्रीकांत वष्ट, शिरीष गोखले यांनी संस्थेच्या इतिहासासह भविष्यात नियोजित क्रीडा-आरोग्य आदी विविध विषयांच्या उपक्रमासंदर्भात माहिती दिली.