

कोल्हापूर ; पूनम देशमुख : देवदर्शनाची भूलथाप मारून पोटच्या गोळ्याने जन्मदात्या आईला रेल्वेने कोल्हापुरात आणले; पण मुलाच्या मनात काहीतरी वेगळेच होते… रेल्वेतून खाली उतरल्यावर त्याने आसपासच्या परिस्थितीचा अंदाज घेतला अन् आपल्या जन्मदात्रीला बेवारस सोडून पसार झाला.
बर्याच वेळानंतरही मुलगा दिसत नाही म्हटल्यावर भांबावलेल्या आईने आजूबाजूला शोध घेतला; पण नवखे शहर आणि भाषेचा अडसर असल्याने तिला समोरच्यांच्या प्रश्नांच्या मार्याने ती आणखी भांबावून गेली. आठवडाभरापासून प्रश्नोत्तराचा हा खेळ सुरू आहे. माणुसकीला काळिमा फासणार्या या घटनेमुळे आईला मानसिक धक्काच बसला.
आजही आपला पोटचा गोळा आपल्याला न्यायला परत येणार, या भाबड्या आआशेवर ती माऊली मुलगा सोडून गेलेल्या ठिकाणीच त्याची वाट पाहत आहे. भीक न मागता सोबत असलेल्या पिशवीतील तांदूळ आणि पीठ कच्चेच खाताना स्थानिकांनी तिला पाहिले. त्यानंतर तिची विचारपूस सुरू केली. मराठीसह हिंदी, कन्नड भाषेतून तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला; पण ती महिला तामीळ असल्याचे लक्षात आले. अद्यापही तिला तिच्या घरच्यांबद्दल सांगता आले नाही. ना कोणी तिच्या चौकशीसाठी त्या परिसरात आले आहे. अशा स्थितीत एका समाजसेवी संस्थेत तिला दाखल करून घेण्यासाठी आले असता तिने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला.
सर्वसाधारण कुटुंबातील पन्नाशी गाठलेली ही महिला कपिलतीर्थ मार्केट नजीकच्या फळ बाजाराशेजारील हातगाड्यांच्या खाली साडीचे पांघरूण करून झोपते. दिवसभर त्याच परिसरात मुलाच्या ओढीने घुटमळत राहते. कोणी स्वतः हून खायला दिले तर खाते. काहीशा ओळखीच्या झालेल्या फळ व्यापार्यांनी दिलेल्या दहा-वीस रुपयांमध्ये काहीतरी खाऊन ती माऊली सध्या कसेबसे दिवस काढत आहे.
कित्येक माता-पिता जगताहेत अनाथाचं जीण!
शहरात सहज फिरताना नजर टाकल्यास अनेक वृद्ध व्यक्ती रस्त्याकडेला दिसतील. कोणाला घरातून बाहेर काढले आहे, तर कोणाला घरच्यांनी सोडले आहे. कोणी स्वतः मुलाबाळांच्या सुनेच्या त्रासाला कंटाळून अखेरचा प्रवास एकट्याने करत आहे. यामध्ये महिलांची प्रचंड मानसिक व शारीरिक फरफट होत आहे. यापूर्वी अशाच काही फिरस्त्या महिलांवर अत्याचाराचे प्रसंग घडले आहेत.