

कोल्हापूर, प्रवीण मस्के : शिक्षक भरतीसाठी आवश्यक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणीचा अखेर मुहूर्त ठरला आहे. मात्र, राज्य सरकारने काढलेल्या नवीन सुधारित आदेशास राज्यभरातून विरोध होऊ लागला आहे. या निर्णयामुळे पात्र उमेदवारांची मोठी अडचण होणार आहे.
शिक्षक भरतीमध्ये मागील काळात झालेले घोटाळे टाळण्यासाठी पुन्हा एकदा नव्याने पवित्र पोर्टल द्वारे राज्य सरकारकडून शिक्षक पदभरतीत नवीन सुधारणा करण्यात आल्या आहेत. यापूर्वी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये एका उमेदवाराला गुण सुधारण्यासाठी जास्तीत-जास्त पाचवेळा संधी उपलब्ध होत्या. सरकारने आता यात नवीन नियम जोडले आहेत. त्यानुसार उमेदवाराला प्रत्येक वेळी होणार्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस बसणे बंधनकारक असणार आहे. उमेदवारांच्या पूर्वी दिलेल्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने येणार्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.
2017 मध्ये झालेल्या शिक्षक अभियोग्यता चाचणीची पदभरती अजून अपूर्ण ठेवून दुसरी अभियोग्यता चाचणीची घोषणा सरकारने केली आहे. जर जुने गुण रद्द होत असतील तर डिसेंबर 2017 मध्ये अभियोग्यता चाचणी दिलेल्या उमेदवारांवर अन्याय होणार आहे. शिक्षक अभियोग्यता चाचणीतून एकदा निवडलेला उमेदवार शिक्षक भरती प्रक्रियेत येता कामा नये. अभियोग्यता चाचणी पहिली ते बारावीसाठी एकच न घेता पहिली ते आठवी वेगळी परीक्षा व नववी ते बारावी अशी एक परीक्षा असावी. 2017 मध्ये झालेल्या परीक्षेतील गैरकारभार टाळण्यासाठी ही परीक्षा राज्यात एकाच दिवशी ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
फेब्रुवारीत चाचणी परीक्षा
शिक्षण विभागाकडून शिक्षक भरतीसाठीची अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. डिसेंबरमध्ये परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होईल. त्यानंतर फेब—ुवारी महिन्याच्या दुसर्या आठवड्यात अभियोग्यता चाचणी परीक्षा होऊन मार्चमध्ये निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.