सिंधुदुर्ग : मतदारसंघात केलेले एकतरी उल्लेखनीय काम दाखवा! आमदार दीपक केसरकरांना आव्हान

सिंधुदुर्ग : मतदारसंघात केलेले एकतरी उल्लेखनीय काम दाखवा! आमदार दीपक केसरकरांना आव्हान
Published on
Updated on

सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार आ. दीपक केसरकर यांना नाही. कोरोना काळामध्ये मतदारसंघाला वार्‍यावर सोडून आ. केसरकरांनी मतदारांशी प्रतारणा केली. कोटयवधी रुपयांचा निधी आणण्याचा डिंगोरा पिटला. त्यांनी मतदारसंघात एकतरी असे काम दाखवावे ज्यामधून 100 जणांना रोजगार मिळाला, असे आव्हान शिवसेनेचे सावंतवाडी मतदारसंघ संपर्क प्रमुख शैलेश परब यांनी आ. केसरकरांना दिले.

शैलेश परब म्हणाले, स्वतःला निष्ठावंत शिवसैनिक म्हणविणार्‍या आ.केसरकरांनी आपण यापुढे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करणार नसल्याचे सांगितले होते. तसेच सहकारी आमदार व भाजपमधील कुणीही टीका करू नये, असे आवाहन केले होते. मात्र ते स्वतः व अन्य बंडखोर आमदार ठाकरे कुटुंबीयांवर नाहक टीका करत आहेत. ही टीका शिवसैनिक खपवून घेणार नाहीत, असा इशारा श्री. परब यांनी दिला. आत्तापर्यंत आम्ही तुमच्या वयाचा मान राखून शांत होतो, शिवसैनिकांनाही शांत राहण्याचे आवाहन केले होते. परंतु पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाहक चिखल फेक केली तर यापुढे गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

आ. केसरकर यांनी यापूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या दोन मुलांनी सुधारावे, असे आवाहन केले होते. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात काम करण्याची इच्छा केसरकर यांनी व्यक्त केली. तिथे ते ना.नारायण राणे यांच्या मांडीला मांडी लावून बसणार. म्हणजे,आता राणे कुटुंबीय सुधारले आहेत असे म्हणायचे काय? त्यांचा राजकीय दहशतवाद संपला आहे काय? असे सवाल श्री. परब यांनी केले. तुम्ही कितीही प्रयत्न करा, परंतु ठाकरे कुटुंबीय, शिवसेना, मातोश्री, सेना भवन आणि शिवसैनिक हे पाच शब्द एकमेकांपासून तुम्ही कधी अलग करू शकणार नाही.

आ. केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि आपल्या मतदारसंघात कोणता विकास केला ते सांगावे. सावंतवाडी येथील मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल हे केसरकर यांच्यामुळेच गेले दोन वर्षे रखडले आहे. यापूर्वी त्यांनी जिल्ह्यात एक लाख सेट टॉप बॉक्स वाटन करणार असल्याचे जाहीर केले होते, त्याचे काय झाले. जिमखाना मैदानावर शेकडो बेरोजगारांचे नोकरीसाठी फॉर्म भरून घेतले, त्यातील किती जणांना नोकरी अथवा रोजगार उपलब्ध करुन दिला?. इन्सुलीतील प्रस्तावीत चष्म्याचा कारखाना कुठे राहिला? आंबोली येथील गोल्फ कोर्स चे काय झाले? 'चांदा ते बांदा' योजनेतून आलेला 300 कोटी रुपयांचा निधीपैकी किती निधी खर्च केला? पाच वर्षे शिवसेनेने त्यांना गृह, वित्त आणि नियोजन राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिले, या मंत्रीपदाचा उपयोग जिल्ह्यातील विकास कामांसाठी आणि जनतेच्या भल्यासाठी काय केलात, असे सवाल करत, या प्रश्नांची उत्तरे जनतेला दया, असे आव्हान श्री. परब यांनी आ. केसरकरांना केले.

राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये आल्यानंतर झालेल्या निवडणुकीत शिवसेनेमुळे तुम्हाला 42 हजारांची लीड मिळाले, मात्र तुम्ही काम न केल्यामुळे गेल्या निवडणुकीत हे 12 हजार एवढे खाली आले. याचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे. फूड पार्क, अमेझिंग पार्क, फिशर मेन व्हिलेज, वृंदावन च्या धरतीवर तिलारी येथे गार्डन, रॅपलिंग, बारमाही धबधबे तयार करणे, तिलारी खाडीमध्ये बोटिंग, यांत्रिकी शेती, कृषी आर्मी नीरा, काथ्या उद्योग, कुक्कुटपालन, मेंढीपालन, महिलांसाठी खेकडा पालन या सह अशा अनेक शेकडो योजनांची घोषणा त्यांनी केली. यातील एकतरी घोषणा त्यांनी सतत्यात उतरवली काय ? याचे उत्तर केसरकर यांनी जनतेला द्यावे.

केसरकर यांना आपल्या मतदारसंघात किती विभाग प्रमुख, किती उपविभाग प्रमुख, किती शाखाप्रमुख आहेत याची ही माहीत नाही. त्यांच्या आमदारकीसाठी ज्या शिवसैनिकांनी व पदाधिकार्‍यांनी घाम गाळला, रक्ताचे पाणी केले त्यांना सोडून हे आ. केसरकरांनी केवळ स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षेपायी बंडखोर केली आहे.यामुळे शिवसैनिकांना नीतिमत्ता शिकवू नये, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर केसरकर शिवसेनेमध्ये आले. त्यांना बाळासाहेबांचे विचार काय माहिती? असा सवाल त्यांनी केला. बाळासाहेबांनी शिवसैनिकांना गद्दारी कधी शिकवली नाही. शिवसेना ही रस्त्यावर काम करणारी संघटना आहे त्यामुळे जनता त्यांना कायमचे घरात बसविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास परब यांनी व्यक्त केला आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून केवळ सहा महिन्यांचा कालावधी मिळाला. दोन वर्षे ही कोरोना या जागतिक महामारीच्या संकटामध्ये गेली. कोरोना आटोक्यात येत असताना ते आजारी असताना या सर्व दगाबाजाने बंडखोरी केली याचे सर्वात मोठे दुःख आहे. जनता या बंडखोरांना कधीही माफ करणार नाही. बंडखोरांना मतपेटीतून उत्तर देईल, असा विश्वास परब यांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news