

देवगड; सूरज कोयंडे : गणेशोत्सव हा कोकणचा महाउत्सव. सर्वसाधारणपणे घरोघरी गणेशमूर्तीचे भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून पूजन केले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही वैशिष्ट्यपूर्ण गणेशोत्सव पाहावयास मिळतात. विशेष म्हणजे शेकडो वर्षांचा इतिहास असलेले हे गणेशोत्सव आजही त्याच परंपरांचे पालन करत श्रद्धेने व भक्तिभावाने साजरे होत आहे. आज सोशल मीडियाच्या जमान्यात अशा गणेशोत्सवांची महती जगभर पसरल्याने हे आगळेवेगळे लक्षवेधी गणेशोत्सव पाहण्यासाठी भाविक व पर्यटकही गर्दी करतात.
जिल्ह्यात सर्वत्र घरोघरी गणपती आणून गणेशोत्सव साजरा केला जातो; मात्र देवगड तालुक्यात एकाच मंडपाखाली दोन गणपती व गौरी पूजनाची अनेक वर्षांची परंपरा देवगड किल्ला भागातील गोळवणकर कुटुंबीयांनी जोपासली आहे. एकाच मंडपाखाली दोन गणपती व गौरी हा गणेशोत्सव यामुळेच लक्षवेधी ठरला आहे.
एकाच मंडपाखाली दोन गणपती व गौरी पूजन परंपरेमागे एक आख्यायिका आहे.अनेक वर्षांपूर्वीची ही परंपरा. त्यावेळी गोळवणकर व मुणगेकर कुटुंबियांची गलबते होती. या कुटुंबातील लोक चतुर्थीदिवशी किंवा चतुर्थी अगोदर गणेशाची मूर्ती मुंबईहून गलबतामधून देवगडला आणत. एक वर्षी गणेशाची मूर्ती घेऊन मुंबईहून देवगडला निघालेले गलबत वादळी वारा व पावसामुळे देवगड बंदरात आले नाही. त्यामुळे गोळवणकर कुटुंबातील सर्वजण चिंताग्रस्त झाले. घरातील सगळी मंडळी गणेशाच्या स्वागतासाठी देवगड बंदराकडे डोळे लावून बसली होती. परंतु त्यादिवशी गलबत न आल्यामुळे सर्वांच्या चेहर्यावर चिंतेचे सावट होते. त्यादिवशी देवगडमधील सर्व लोकांनी आपआपल्या घरी श्रीगणेशाची स्थापना केली. अखेर दुपार झाली तरी मूर्ती घेऊन येणारे गलबत बंदरात न आल्याने गोळवणकर कुटुंबियांनी दुपारी दीड वा.च्या सुमारास गावातील गणेश मूर्तिकार श्री.कुळकर्णी यांच्या गणेश शाळेतून श्रीगणेशाची मूर्ती आणून तिची प्रतिष्ठापना केली.
दरम्यान, काहीवेळाने मूर्ती घेऊन येणारे गलबत देवगड बंदरात दाखल झाले. त्या गलबतामधील गोळवणकर कुटुंबातील एका सदस्य श्रीगणेशाची मूर्ती घेऊन घरी आला. मात्र कमालीचा वेळ झाल्याने घरात अगोदरच मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्याने या मूर्तीचे आता काय करायचे? असा प्रश्न कुटुंबातील सर्वांनाच पडला. अखेर घरातील सर्व ज्येष्ठ मंडळीनी विचारविनिमय करून ब्राह्मणाचा सल्ला घेण्याचे ठरविले. या कुटुंबातील मंडळीनी ब्राह्मणाला भेटून सल्ला घेतला असता ब्राह्मणाने गलबतातून आणलेल्या मूर्तीचीही प्रतिष्ठापना करावी असे सांगितले.तेव्हापासून गोळवणकर कुटुंबियांमध्ये एकाच मंडपीखाली दोन गणपती पूजन करण्याची परंपरा सुरू झाली.
गोळवणकर कुटुंबियांमध्येही गणेश पूजनाबरोबरच गौरी पूजनही केले जाते.त्यानंतर गौरीचा जागर केला जातो व रात्री 12 वा. पर्यंत नवस बोलणे व फेडण्यासाठी येथे लोक येत असतात.नवसाला पावणारी गौरी म्हणून गोळवणकर कुटुंबियांची गौराई देवगड तालुक्यात प्रसिध्द आहे. एकाच मंडपीखाली दोन गणपती व गौरी पूजन हे दृश्य सिंधुदुर्गच्या गणेशोत्सवाचे एक वेगळे वैशिष्ट्य बनले आहे.