सिंधुदुर्ग : अकरावीच्या किमान 4 हजार 387 जागा रिक्त राहणार!

सिंधुदुर्ग : अकरावीच्या किमान 4 हजार 387 जागा रिक्त राहणार!

सिंधुदुर्ग ; पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दहावीचा निकाल 99.42 टक्के इतका विक्रमी लागूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी पुरेशा जागा जिल्ह्यातील कॉलेजांमध्ये उपलब्ध आहेत. यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 10 हजार 53 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 14 हजार 440 जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांपेक्षा प्रवेश क्षमता जास्त असल्याने कोणताही विद्यार्थी प्रवेशाविना राहणार नाही, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी मुस्ताख शेख यांनी दिली.

दहावी परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 10 हजार 53 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचे वेध लागले आहेत. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी पुढील उच्च शिक्षणाच्या अनेक वाटा खुल्या आहेत. त्यात शासकीय तंत्रनिकेत, आयटीआयसह विविध अभ्यासक्रमही आहेत. त्याबरोबरच कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांतही विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कला शाखेच्या 39 तुकड्या असून 3 हजार 320 प्रवेश क्षमता आहे. तर वाणिज्य शाखेच्या 41 तुकड्या असून 3 हजार 500 प्रवेश क्षमता, विज्ञान शाखेच्या 44 तुकड्या असून 3 हजार 940 प्रवेश क्षमता, संयुक्त 42 तुकड्या असून 3 हजार 680 प्रवेश क्षमता उपलब्ध आहे. जिल्ह्यात अकरावीत प्रवेश घेण्यासाठी प्रवेश क्षमता 14 हजार 440 असल्याने उत्तीर्ण झालेल्या 10 हजार 53 उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशाची कोणतीही अडचण येणार नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 10 हजार 53 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तर यंदाच्या शैक्षणिक वर्षांत अकरावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी एकूण 14 हजार 440 जागा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशासाठी 4 हजार 387 जागा रिक्त राहणार आहेत. तर अकरावीच्या प्रवेशासाठी जिल्ह्यात विद्यार्थी संख्या कमी राहणार असल्याने अनेक विद्यार्थ्यांना हवे त्या महाविद्यालयात व शाखेत प्रवेश घेणे सोयीचे जाणार आहे.

कोरोनाच्या ऑनलाईन परीक्षेनंतर यंदाची दहावीची परीक्षा ऑफलाईन घेण्यात आली होती. त्यामुळे पालकांची निकालाबाबत उत्सुकता वाढली होती. ही उत्सुकता 17 जून रोजी दुपारी 1 वा. निकाल लागल्यानंतर कुठे आनंदाच्या तर कुठे नाराजीच्या स्वरुपात दिसून आली. जिल्ह्याचा दहावीचा निकाल 99.42 टक्के इतका लागला असून, सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात प्रथम स्थानी आला आहे. या निकालात पुन्हा मुलींनीच बाजी मारली आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यात 5 हजार 189 मुलगे आणि 4 हजार 864 मुली उत्तीर्ण झाल्या. यात मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 99.34 तर मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 99.50 टक्के आहे.

जिल्ह्यात यावर्षी 10 हजार 53 मुले उत्तीर्ण झाली असली तरीही प्रवेश क्षमता 14 हजार 440 आहे. म्हणजेच 4 हजार 387 जागा रिक्त राहणार आहेत. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुले दहावी, बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी मुंबई, पुणे या ठिकाणी जातात. त्यामुळे या रिक्त जागांमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news