राजन तेली म्हणाले, विधान परिषदेनंतर राज्याच्या सत्तेतही चमत्कार घडेल!

राजन तेली म्हणाले, विधान परिषदेनंतर राज्याच्या सत्तेतही चमत्कार घडेल!
Published on
Updated on

सावंतवाडी ; पुढारी वृत्तसेवा : विधान परिषदेनंतर आता राज्यातील सत्तेतही चमत्कार घडेल. मुंबई, विदर्भ, मराठवाड्यासह कोकणातील आमदारांचीही यासाठी साथ मिळेल.आगामी खासदार,आमदार हे भाजपचेच असतील अशी रणनीती सुरू असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजपा शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, माजी नगरसेवक मनोज नाईक, सुधीर आडीवरेकर, राजू बेग, आनंद नेवगी, दीपाली भालेकर, माजी जि. प. सभापती लॉरेन्स मान्येकर, बंटी राजपुरोहित, विनोद सावंत, दिलीप भालेकर, संजू शिरोडकर, गुरू मठकर, सत्यवान बांदेकर, अजय सावंत उपस्थित होते.
तेली म्हणाले, राज्यसभा व विधान परिषदेतील अभूतपूर्व विजयानंतर आता राज्यातील सत्तेत देखील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चमत्कार घडेल.

कोकणातील आमदारही या चमत्कारात सहभागी होतील. भाजपा हा राज्यसभेच्या निवडणुकीनंतर विधान परिषद निवडणुकीत मोठा पक्ष ठरला आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष होऊनही शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला, त्यामुळे राज्यात भाजपा सरकार आले नसले तरी शिवसेनेच्या आमदारांना काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत राहणे शक्य नाही,ही खदखद एकनाथ शिंदे यांच्या रूपाने आता बाहेर आली आहे. त्यामुळे राज्यात चमत्कार होईल आणि देवेंद्र फडवणीस राज्याची काळजी वाहतील, असे तेली म्हणाले.

देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री असतानाचे प्रकल्प या सरकारने बंद केले. त्यामुळे या सरकारला जनतेच्या रोषासोबत आता आमदारांच्या रोषालाही सामोरे जावे लागेल. यापुढील निवडणुकांमध्ये कोकणातील खासदार, सिंधुदुर्ग व रत्नागिरीतील आमदार हे भाजपचे कसे होतील यासाठी सध्या भाजपची व्यूहरचना सुरू असून येत्या 24 जून रोजी माजी मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत एक बैठक होणार आहे. यापुढील काळात कोकणातील खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदा या सर्व भाजपच्या ताब्यात याव्यात म्हणून नियोजन सुरू असून जिल्ह्यातील तिन्ही आमदार हे भाजपचे बसतील, असा विश्वास तेली यांनी व्यक्त केला.

एबी फॉर्म मीच वाटणार!

राजन तेली यांनी शेजारी बसलेल्या माजी नगराध्यक्ष आणि जिल्हा प्रवक्ते संजू परब यांच्या पाठीवर थाप देऊन तू काही घाबरू नकोस, निवडणुकीचे एबी फॉर्म माझ्याकडेच असतील आणि जिल्हाध्यक्ष म्हणून ते मीच वाटणार असे मिश्कीलपणे सांगितले. संजू परब तुम्ही कोणाचा प्रचार करणार? राजन तेलींचा की युवराजांचा? असा सवाल पत्रकारांनी केल्यानंतर राजन तेलींनी संजू परब यांना आश्वस्त केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news