रत्नागिरी : शाळांमध्ये फुलणार आता परसबाग !

रत्नागिरी : शाळांमध्ये फुलणार आता परसबाग !

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : केंद्र शासनाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबागा निर्माण करून परसबागांमधून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा व विद्यालयांमध्ये परसबागा फुलणार असून विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक होणार आहे.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत परसबाग निर्माण करण्याचा उपक्रम प्रभावीपणे शाळास्तरावर राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी उत्कृष्ट परसबाग स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी परसबागेत पिकवलेला भाजीपाला, फळे इत्यादीचा शालेय पोषण आहारात समाविष्ट करून विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण व्हावी, पोषक आहार मिळावा, कुपोषण दूर व्हावे असे विविध चांगले हेतू या उपक्रमामुळे साध्य होणार आहेत. ग्रामीण व शहरी भागातील काही शाळांमध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे हा उपक्रम राबवला गेला नाही. केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे शाळांमध्ये परसबागा निर्माण विविध प्रकारांच्या भाजीपाल्याची लागवड करावयाची आहे.

परसबागामधून उत्पादित ताजा भाजीपाला या पदार्थाचा वापर शालेय पोषण आहारामध्ये करण्यात यावा. परसबागांमध्ये आपत्कालीन सूक्ष्म भाजीपाल्यामध्ये मेथी, वाल, हरभरा, मूग, बीट, मका, मुळा, मोहरी, सूर्यफूल, कांदा, वाटाणा, चवळी, पालक, राजमा, गहू, इत्यादींची लागवड करावी. हा पौष्टिक भाजीपाला 7 ते 10 दिवसांत तयार होतो. मायक्रोग्रीन्समध्ये पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यांच्यातील पोषक घटक अर्क स्वरूपात असतात. पूर्णपणे वाढलेल्या भाज्यांच्या तुलनेत सूक्ष्म जीवनसत्त्वे, क्षार, अँटी ऑक्सिडंटसची पातळी अधिक असते. प्रत्येक मायक्रोग्रीनमधील पोषक घटकामध्ये फरक असला तरी बहतेक प्रकारामध्ये पोटॅशिअम, लोह, झिंक, मॅग्नेशिअम आणि तांबे हे घटक मूबलक प्रमाणात असतात.

परसबागेसाठी घ्या मार्गदर्शन…

विद्यार्थ्यांचा वयोगट विचारात घेऊन शाळांमध्ये परसबाग सेंद्रिय पद्धतीने निर्माण करावी. विद्यार्थ्यांना कंपोस्ट, गांडूळ अशी पर्यावरणपूरक खते तयार करण्यास शिकवावे. शाळांनी नजीकच्या कृषी विज्ञान केंद्र, कृषी शाळा, कृषी क्षेत्रात काम करणार्या अशासकीय संस्था, सेंद्रिय शेती करणारे पालक, शेतकरी, कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे, असे शासनाच्या आदेशात नमूद केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news