रत्नागिरी : लांजा न. पं. ‘माझी वसुंधरा’ मध्ये राज्यात 17 वी

रत्नागिरी : लांजा न. पं. ‘माझी वसुंधरा’ मध्ये राज्यात 17 वी

लांजा; पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण राज्यामध्ये माझी वसुंधरा अभियान राबविण्यात आले. नगरपंचायत विभागामध्ये राज्यातील 137 नगरपंचायती या अभियानात सहभागी झाल्या होत्या. यामध्ये लांजा नगरपंचायतीला राज्यात 17 वा क्रमांक मिळाला आहे. तर लांजा नगरपंचायत जिल्ह्यात अव्वलस्थानी राहिली आहे.

माझी वसुंधरा अभियान संपूर्ण राज्यात विविध स्तरावर राबविण्यात येते. या अभियानात सर्वोत्कृष्ट काम करणार्‍या नगर पंचायती, नगर परिषदा, नगरपालिका यांना गौरविण्यात येते. या अभियानाच्या माध्यमातून विविधांगी उपक्रम, वृक्ष लागवड, शहराचा सार्वजनिक स्वच्छतेचा सर्वांगिण विकास घडवून आणणे हा उद्देश आहे. लांजा नगर पंचायतीने हे उपक्रम यशस्वीपणे राबविले. या जोरावरच या अभियानात नगर पंचायती विभागात राज्यात 17 वा तर रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवणारी लांजा नगरपंचायत ठरली आहे.

लांजा नगर पंचायतीच्या वतीने गेले वर्षभर माजी वसुंधरा अभियानांतर्गत राबविण्यात आलेले अनेक उपक्रम, वृक्ष लागवड, हेरिटेज वृक्ष गणना व त्याची जतन करण्याची मोहीम, प्राचीन तळ्याची स्वच्छता मोहीम, ई वाहनांना चालना देण्यासाठी चार्जिंग पॉईंट उभारणी, संपूर्ण शहरांमध्ये स्वच्छता मोहीम, प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालून कापडी पिशव्यांना चालना, स्मृती उद्यान – हरित उद्यान, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन शिबिर असे अनेक विविध उपक्रम लांजा नगरपंचायतीच्या वतीने राबविण्यात आले.

याकामी नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष आणि पाणी व स्वच्छता विभागाचे सभापती स्वरूप गुरव यांनी या अभियानाचे नेतृत्व करताना संपूर्ण अभियान यशस्वी होण्यासाठी गेले वर्षभर अंमलबजावणी केली. क वर्गात मोडत असणार्‍या या नगरपंचायतीने निधीचा स्त्रोत कमी असतानाही केलेली ही कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. नगराध्यक्ष मनोहर बाईत, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी तुषार बाबर व त्यांचे सर्व सहकारी आणि कर्मचारी यांनी या अभियानात हिरिरीने सहभाग घेतला होता.

सर्वांच्या सहकार्यामुळे हे यश मिळवणे शक्य झाले

वर्षभर घेतलेली मेहनत, सुयोग्य नियोजन, नगराध्यक्ष मनोहर बाईत, सर्व नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा प्रत्यक्ष कृतिशील सहभाग आणि परिश्रम यामुळेच आम्ही यापर्यंत पोहोचू शकलो, अशी प्रतिक्रिया उपनगराध्यक्ष व पाणी व स्वच्छता समिती सभापती स्वरूप गुरव यांनी दिली. भविष्यात देखील शहरामध्ये विविध उपक्रम सुरू ठेवण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news