रत्नागिरी/ठाणे; पुढारी वृत्तसेवा : कोकणात झालेल्या 556 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शिंदे विरुद्ध ठाकरे गटाची जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. सर्वाधिक ग्रामपंचायती असलेल्या पालघरमध्ये भाजपने 97 ग्रामपंचायती जिंकून मुसंडी मारली, तर त्या खालोखाल शिंदे गटाने सरशी मिळवली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) आपणच 'पॉवरफुल' असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. शिंदे गट व भाजप मात्र धोबीपछाड, तर सिंधुदुर्गात भाजपने ठाकरे गटावर मात करत 2 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. तर ठाण्यामध्ये भिवंडी-शहापूरमध्ये ठाकरे गट, तर मुरबाडमध्ये भाजप -शिंदे गट यांना यश मिळाले. रायगड जिल्ह्यात आघाडीने वर्चस्व राखले आहे.
कोकणातील एकूण पाच जिल्ह्यांमध्ये 556 ग्रामपंचायतींपैकी भाजप आणि शिंदे गटाने मिळून 190 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत, तर उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीने 191 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. तर अपक्ष ग्रामपंचायतींची संख्या 100 च्या घरात आहे. आता हे अपक्ष कुणाकडे वळणार याची उत्सुकता ताणलेली राहणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण 4 ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. यामध्ये दिपक केसरकरांवर नारायण राणेंच्या भाजपने मात करत 2 ग्रामपंचायती मिळवल्या आहेत. तर देवगडमध्ये ठाकरे गटाने 1 ग्रामपंचायत हाती घेत आपले अस्तित्व दाखवले आहे. एका ठिकाणी अपक्ष ग्रामपंचायत आहे. रायगडमधील 16 ग्रामपंचायतीपैंकी आघाड्यांकडे 5, ठाकरे गट 4, शिंदे गट 4, भाजप 2 तर शेकाप एका जागेवर विजयी झाला.
पालघर जिल्ह्यातील 345 ग्रामपंचायतींपैकी 97 भाजप, 74 शिंदे गट, 46 राष्ट्रवादी काँग्रेस, 27 ठाकरे गट, 17 काँग्रेस, 9 सीपीएम, 4 मनसे तर उर्वरित 60 ग्रामपंचायतींवर अपक्षांचे वर्चस्व आहे. ठाणे जिल्ह्यात एकूण 140 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यामध्ये ठाकरे गटाने वर्चस्व मिळवले असून शहापूरमध्ये 55, तर भिवंडीमध्ये 14 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. भाजप शिंदे गटाने मुरबाडमध्ये 15 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले असून 7 ठिकाणी अपक्ष निवडून आले आहेत. भिवंडी आणि शहापूरमध्ये भाजप – शिंदे गटाला धक्का मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 36 ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. यामध्ये जिल्ह्यातील 36 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. गावचा गाडा नेमका कोण हाकणार हे आता स्पष्ट झाले आहे.
शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) आपणच 'पॉवरफुल' असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. प्रतिष्ठेच्या व मोठ्या ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने आपला कब्जा केला आहे. शिंदे गट व भाजपचा मात्र धोबीपछाड झाला आहे. मंत्री उदय सामंत यांना धक्का बसला आहे. त्यांच्याकडून महत्त्वाच्या ग्रामपंचायती ठाकरे गटाकडे गेल्या आहेत.
जिल्ह्यातील 51 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी 15 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. यामध्ये चिपळूण तालुक्यात संख्या जास्त आहे तर 36 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले होते. सोमवारी तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी पार पडली. सध्याचे राजकीय धुमशान बघता गाव पातळीवरील निवडणुकांमध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे मतदार नेमका कोणाला कौल देणार हे पाहणे महत्त्वाचे आणि उत्सुकतेचे ठरले होते.