सिंधुदुर्ग : बिबट्याची 14 नखे, दोन दातांसह बंदूक जप्त; नाटळ जंगलात केली होती शिकार

सिंधुदुर्ग : बिबट्याची 14 नखे, दोन दातांसह बंदूक जप्त; नाटळ जंगलात केली होती शिकार
Published on
Updated on

कणकवली; पुढारी वृत्तसेवा : बिबट्या कातडी तस्करीप्रकरणात पोलिस कोठडीत असलेले संशयित आप्पा सावंत याच्याकडून पोलिसांनी एक बंदूक, 14 वाघनखे, 2 दात व शिकारीची बॅटरी जप्त केली. तर मंगेश सावंत याच्याकडून 2 चाकू, एक कोयता, कुदळ, खोरे, शिकारीची बॅटरी हस्तगत केली. आप्पा सावंत याने त्याच्या घरापासून नजीक असलेल्या नाटळ जंगलात अडीच कि.मी.वर दोन वर्षापूर्वी बिबट्याची शिकार केली होती. त्या स्थळाची पोलिसांनी बुधवारी घटनास्थळी जावून पाहणी केली व ज्या ठिकाणी बिबट्याचा मृतदेह पुरण्यात आला होता तो खड्डाही उकरून हाडे मिळतात का? हे पाहण्यात आले. मात हाडे काही मिळाली नाहीत.

बिबट्या कातडे तस्करीप्रकरणात आतापर्यंत सहाजणांना अटक करण्यात आली आहे. पैकी दोघेजण हे बिबट्याच्या कातडीची विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करताना आढळून आले होते. त्यांच्या चौकशीत संतोष मधुकर मेस्त्री, श्रीराम सखाराम सावंत-कुंभवडे,आप्पा हरिश्चंद्र सावंत, मंगेश पांडुरंग सावंत-भिरवंडे यांची नावे पुढे आली. सध्या हे चौघेजण पोलिस कोठडीत आहेत. त्यांच्याकडे केलेल्या कसून चौकशीत पोलिसांनी वरील वर्णनाचा मुद्देमाल हस्तगत केला, त्याची किंमत लाखोंच्या घरात आहे. या प्रकरणात आणखी काही संशयितांची नावे पुढे येत आहेत. त्यातून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

याप्रकरणाचा तपास करणारे पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, महिला पोलिस उपनिरीक्षक वृषाली बरगे, पोलिस हवालदार चंद्रकांत झोरे, पोलिस नाईक पांडुरंग पांढरे यांनी बुधवारी आप्पा सावंत व मंगेश सावंत यांना घेवून नाटळच्या जंगलात ज्या ठिकाणी बिबट्याची दोन वर्षापूर्वी शिकार झाली होती त्या स्थळावर जावून पाहणी केली. आप्पा सावंत याने बंदुकीने बिबट्याची शिकार केल्याचे पुढे येत आहे. त्याने ज्या ठिकाणी बिबट्याची कातडी, नखे, दात काढून मृतदेह पुरला होता तो खड्डा उकरून काढला. मात्र त्यात बिबट्याची हाडे मिळू शकली नाहीत. कदाचित डुक्कर किंवा इतर वन्य प्राण्यांनी बिबट्याचा मृतदेह उकरून काढला असावा. मात्र ज्या जंगलात शिकार झाली ते जंगल आणि त्या स्थळाचा पर्दाफाश पोलिसांनी केला.

याप्रकरणात या संशयित आरोपींकडे कसून चौकशी केली असता आणखी काही संशयितांची नावे पुढे येत आहेत. ते पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांचा या प्रकरणात कितपत सहभाग होता याचा सखोल तपास पोलिस करत आहेत. खात्री नंतरच त्या संशयितांना ताब्यात घेणार असल्याचे तपासी अधिकारी अनिल हाडळ यांनी सांगितले.

दोन महिन्यात दुसर्‍या शिकारीचा पर्दाफाश

दोन महिन्यापूर्वी अशाच प्रकारे पोलिसांनी नांदगाव दरम्यान बिबट्याच्या कातडीची तस्करी उघडकीस आणली होती. याप्रकरणात पोलिसांनी मुळापर्यंत जावून बिबट्याची शिकार करणार्‍या मुख्य संशयितासह अन्य काहीजणांना ताब्यात घेतले होते. सलग दुसर्‍यांदाही असाच प्रकार उघडकीस आला आहे. बिबट्याची शिकार करून त्याचे कातडे, नखे, दात यांची विक्री करायची आणि त्यातून लाखो रूपये कमवायचे हाच संशयितांचा या मागचा उद्देश आहे. जिल्ह्यात एकीकडे बिबट्यांची संख्या वाढली असताना दुसरीकडे बिबट्यांच्या शिकारीत वाढ होत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news