रत्नागिरी : पाईपलाईनचे काम ग्रामस्थांनी रोखले

रत्नागिरी : पाईपलाईनचे काम ग्रामस्थांनी रोखले

खेड; पुढारी वृत्तसेवा : विस्तारित लोटे औद्योगिक वसाहतीसाठी खासगी जागेमधून पाईपलाईन खोदण्यात येत असली तरी औद्योगिक विकास महामंडळाने त्या जागेतील जमीन मालकांना अदलाबदल पद्धतीमध्ये जमीन देण्याची कबुली दिली होती. मात्र, तसे न झाल्याने ग्रामस्थांनी हे काम रोखून धरले आहे.

लोटे विस्तारित औद्योगिक वसाहत परिसरात ग्रामस्थांनी परिसरामध्ये उद्योग येतील, परिसराचा विकास होईल, बेरोजगारांना रोजगार मिळेल या आशेवर व बदली जमीन मिळेल या आश्वासनावर विश्वास ठेवून औद्योगिक वसाहत व पाईपलाईनसाठी जमिनी दिल्या. दहा ग्रामस्थांकडून एकाच दिवशी एमआयडीसीने हक्क सोडपत्र करून घेतले व बदली जमीन देण्याचे कबूल केले. मात्र, सात वर्षे उलटूनही अद्याप जमीन मालकांना बदली जमिनीचा सातबारा अथवा कोणतेही कागदपत्र देण्यात आलेले नाहीत. त्यातच आता ग्रामस्थांच्या जमिनीतून पाईपलाईनचे काम सुरू केले. परिणामी संतप्त ग्रामस्थांनी हे काम रोखून धरले.

याबाबत एमआयडीसीच्या अधिकार्‍यांसोबत पत्रव्यवहार व चर्चा बैठका सुरू असतानाही महामंडळाच्या अधिकार्‍यांनी पोलीस संरक्षणामध्ये काम पूर्ण करण्याचा घाट घातला. लोटे पोलीस दूरक्षेत्रावर या ग्रामस्थांना बोलावणे आले व त्यांना याबाबत आपली बाजू मांडण्यास सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांनी खेडच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्यासमोर या विषयातील सर्व पुरावे कागदपत्रांसह सादर केले व शेतकर्‍यांची बाजू मांडली.

गेली सात वर्षे या बदली जमिनींचा विषय भिजत पडलेला आहे. शेतकर्‍यांच्या खासगी मालकीच्या जमिनी घेताना अंमलबजावणी एका दिवसात झाली आणि बदली जमिनीचे कागदपत्र पूर्ण करून शेतकर्‍यांना जमिनींचा ताबा देण्यास यांना सात वर्षे का लागतात? ग्रामस्थांकडून एमआयडीसीला कायम सहकार्य मिळाले आहे. मात्र, एमआयडीसी शेतकर्‍यांना सहकार्य करण्याऐवजी पोलिस संरक्षणात बेकायदेशररीत्या पाइपलाईनच्या कामाची पूर्तता करण्याचा घाट का घालत आहे? एकीकडे एमआयडीसीचे अधिकारी शेतकर्‍यांबरोबर चर्चा करत आहेत. बदली जमिनीचा विषय लवकरात लवकर निकाली काढून कागदपत्रांसह जमिनीचा ताबा शेतकर्‍यांना देण्याबाबत आश्वासने देतात आणि दुसरीकडे पोलिस प्रशासनाकडे कांगावा करून आपला खोटेपणा झाकून ठेवून पाइपलाईनच्या कामासाठी पोलिस संरक्षण मागतात. याचा अर्थ हे अधिकारी आपल्या कामाचा उरक दाखवण्यासाठी शेतकर्‍यांबरोबर पोलिस प्रशासनाचीही फसवणूक करीत आहे, असा घणाघाती आरोप या शेतकर्‍यांच्या वतीने करण्यात
आला.

यावेळी एमआयडीसी भूमिपुत्र विकास समिती, अतिरिक्त लोटे-परशुरामचे अध्यक्ष हुसैन ठाकूर, कार्याध्यक्ष मनोहर पाडावे, उपाध्यक्ष संदीप चांडीवडे, सदस्य रवींद्र बुरटे, इस्माईल काद्री, श्रीकांत फडकले, गंगाराम इप्ते यांच्यासह ग्रामस्थ तसेच शेतकरी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news