रत्नागिरी : जेएनपीटी बंदरात थेट कंटेनर ट्रेन सेवा सुरू

रत्नागिरी : जेएनपीटी बंदरात थेट कंटेनर ट्रेन सेवा सुरू
Published on
Updated on

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरीतून थेट मुंबईतील जेएनपीटी बंदरात रेल्वेने मालवाहतूक करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून सुरू केलेल्या वातानुकूलित कंटेनर ट्रेनमधून उद्घाटनाच्या पहिल्या फेरीत 250 टन प्रक्रियायुक्त मासळी पाठवण्यात आली. अकरा कंटेनर बुधवारी जेएनपीटीच्या दिशेने रवाना झाले असून रस्त्याने कंटेनर वाहतुकीतील धोके टाळण्यासाठी आणि वेळ व पैशांचीही मोठ्याप्रमाणात बचत होणार असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कोकण रेल्वे मार्गावरील पहिल्या वातानुकूलित कंटेनर ट्रेन कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता, संचालक संतोषकुमार झा, उद्योजक दीपक गद्रे, विभागीय व्यवस्थापक मिलिंद कांबळे यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून जेएनपीटीकडे रवाना झाली. या ट्रेनला अकरा कंटेनर असून गद्रे कंपनीमध्ये प्रक्रिया केलेली मासळी जेएनपीटीमधून अमेरिका आणि युरोपला निर्यात करण्यात येणार आहे.

रत्नागिरीतून ही मालगाडी आठ ते दहा तासांमध्ये जेएनपीटी बंदरात पोहोचणार आहेत. या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता म्हणाले की, वातानुकूलित कंटेनरमधून थेट वाहतूक सुरु झाली असून मासळीसह निर्यात करण्यात येणार्‍या अन्य उत्पादनांसाठी याचा उपयोग करता येईल. व्यापार वाढविण्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. या ट्रेनमधून एकावेळी 45 कंटेनर पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कोल्हापूर, सांगलीमधून द्राक्षांसह अन्य उत्पादनेे वाहतुकीसाठी विचारणा झाली आहे. या प्रसंगी गद्रे कंपनीचे मालक दीपक गद्रे म्हणाले की, निर्यातक्षम माल रत्नागिरी ते जेएनपीटी बंदरापर्यंत पोहचवताना रस्त्यावरुन कंटेनर वाहतूक करणे असुरक्षित आणि धोकादायक बनली आहे. यामध्ये अधिक वेळ आणि पैसाही लागतो. रस्ते अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे कंटेनर ट्रेनचा प्रयोग योग्य आहे. या सुविधेचा उपयोग द्राक्षाबरोबरच हापूसच्या निर्यातीसाठीही होणार आहे. अनेकवेळा जेएनपीटी बंदरामध्ये कंटेनर नेताना अडचणी येतात. मात्र, ट्रेन थेट बंदरापर्यंत जात असल्याने माल लवकर पोचू शकेल. पूर्वी बोटीपर्यंत माल पोचण्यासाठी तीन दिवस लागत होते, आता आठ ते दहा तासात पोचणार आहे. तसेच ट्रक वाहतुकीपेक्षा रेल्वे भाड्याचे दर कमी आहेत. त्यामुळे आर्थिक बचतही होणार आहे.

कोरोनामुळे मागील दोन वर्षात कोकण रेल्वेचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. मात्र, गेल्या सहा महिन्यात कोकण रेल्वेची आर्थिक परिस्थिती स्थिर आहे. परंतु झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी अजून बराच काळ लागेल. तसेच कंटेनर सेवेमुळे रेेल्वेला चांगला फायदा होईल. त्यासाठी किती प्रतिसाद मिळतो हे पहावे लागेल, असे श्री. गुप्ता यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news