

खेड शहर : पुढारी वृत्तसेवा : महावितरण कंपनीच्या खेड व लोटे विभागातील सुमारे 11 हजार 578 ग्राहकांकडे वीजबिलापोटी कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. या थकीत रकमेच्या वसुलीसाठी महावितरणच्या कर्मचारी व अधिकारी यांचे फिरते पथक सक्रिय करण्यात आले आहेत.
महावितरण कंपनीच्या खेड विभाग कार्यक्षेत्रांतर्गत 6 हजार 828 ग्राहकांची फेब्रुवारी महिन्याअखेरपर्यंत 1 कोटी 73 लाख 38 हजार इतकी वीजबिल थकबाकी आहे. यामध्ये 5652 घरगुती ग्राहकांची 39 लाख 22 हजार इतकी थकबाकी आहे. 711 व्यापार्यांची 15 लाख 97 हजार, 35 औद्योगिक कंपन्यांची 8 लाख 37 हजार, 111 शेतकर्यांची 1 लाख 46 हजार, 97 दिवाबत्तीची 86 लाख 26 हजार, 59 पाणीपुरवठा योजनेची 12 लाख 54 हजार, 163 शासकीय व निमशासकीय कार्यालयांची 9 लाख 57 हजारांची देयके बाकी आहेत.
तसेच लोटे विभाग कार्यक्षेत्रांतील 4750 ग्राहकांची 1 कोटी 67 लाख 42 हजार इतकी वीजबिलाची थकबाकी आहे. यामध्ये 4074 घरगुतीची 27 लाख 8 हजार, 239 व्यापार्यांची 6 लाख 64 हजार, 44 औद्योगिक कंपन्यांची 5 लाख 2 हजार, 125 शेतकर्यांची 1 लाख 62 हजार, 93 दिवाबत्तीची 1 कोटी 22 लाख 19 हजार, 43 पाणीपुरवठा योजनेची 2 लाख 37 हजार, 132 शासकीय-निमशासकीय कार्यालयांची 2 लाख 50 हजारांची देयके बाकी आहेत.
आर्थिक वर्षातील शेवटचा महिना असलेला मार्च महिना सुरू झाला असून या महिन्यात ग्राहकांकडून जुनी व नवीन वीजबिल वसुलीसाठी येथील महावितरण कंपनीच्या कर्मचारी व अधिकार्यांची फिरती पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांतील कर्मचार्यांकडून तसेच मोबाईलद्वारे मेसेज पाठवून नोटीस बजावण्यात येत आहेत. निवासी, शेतीपंप, पथदीप, शासकीय व निमशासकीय थकित ग्राहकांनी बिल भरणा न केल्यास वीजजोडणी तोडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
महावितरण कंपनीच्या वसुली पथकांनी थकीत वीजबिलांच्या वसुलीसाठी मोहीम अधिक तीव्र केली आहे. त्यातच शिमगोत्सव आल्याने दोन्ही विभागातील काही ग्राहकांकडून वीजबिल भरणा थकण्याची शक्यता आहे. अशा ग्राहकांकडून थकलेली रक्कम वसूल करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करून दंड लावण्याचा मार्गदेखील अवलंबणार आहेत.