रत्नागिरी : कोकणातून दीड हजार गुरुजींची होणार ‘घरवापसी’

रत्नागिरी : कोकणातून दीड हजार गुरुजींची होणार ‘घरवापसी’
Published on
Updated on

रत्नागिरी; दीपक कुवळेकर : शिक्षण वर्तुळात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या आंतरजिल्हा बदलीची अंतिम यादी अखेर शासनाने जाहीर केली आहे. राज्याचा विचार केला तर 3 हजार 943 जणांची ही यादी आहे. यातील कोकणातील पाच जिल्ह्यांमधील तब्बल दीड हजार शिक्षकांची 'घरवापसी' होणार आहे. यामध्ये सर्वाधिक पालघर जिल्ह्यात 487 त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात 405 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 366 जणांचा यामध्ये समावेश आहे. या शिक्षकांची 'घरवापसी' करायची की नाही, याची चावी मात्र संबंधित जि.प.च्या हाती असणार आहे.

ग्रामविकास विभागाच्या वतीने राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली. राज्यातील या बदल्यांवर रविवारी शिक्कामोर्तब होऊन सोमवारी अंतिम यादी निश्चित केली आहे. शिक्षक बदल्यांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप दरवेळी केला जात होता. यामुळे या प्रक्रियेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली 5 जणांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने दिलेल्या धोरणानुसारच या बदल्या करण्यात येत आहेत.

आंतरजिल्हा बदल्या हा विषय नेहमीच वादाचा ठरला आहे. कारण कोकणातून जाणार्‍या शिक्षकांची संख्याही फार मोठी आहे. मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच येणार्‍यांची संख्या आहे. यामुळे शिक्षणाचा समतोल राखताना जिल्हा परिषदांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. विशेषत: रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही समस्या मोठी आहे. सोमवारी शासनाने अंतिम यादी जाहीर केली असून यामध्ये 3 हजार 943 शिक्षकांचा समावेश आहे.

यामध्ये पालघर जिल्हातील सर्वाधिक शिक्षक परजिल्ह्यात जाणार आहेत. 478 जणांचा यामध्ये समावेश असणार आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातून 405, सिंधुदुर्गतून 366 तर रायगडमधून 249 ठाणेतून 65 असे एकूण 1563 शिक्षक परजिल्ह्यात जाणार आहेत.
या शिक्षकांची बदली करायची की नाही, याची चावी मात्र संबंधीत जिल्हा परिषदेकडे असणार आहे. दहा टक्क्यापेक्षा जास्त पदे रिक्त असतील तर एकाही शिक्षकाला सोडता येणार नाही, तसा शासनाचा नियमच आहे. यामुळे संबंधीत जिल्हा परिषद आता कोणती भूमिका घेते? याकडे लक्ष लागले आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता 17 टक्के पदे रिक्त आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news