रत्नागिरी: अखेर कोकणात मान्सून सक्रिय ;मान्सून अलर्ट’ जारी

रत्नागिरी: अखेर कोकणात मान्सून सक्रिय ;मान्सून अलर्ट’ जारी

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :
शुक्रवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला तर शनिवारी सकाळी त्याचा जोर ओसरलेला होता. गेले अनेक दिवसांची प्रतीक्षा सुरू असताना अखेर मोसमी पाऊस कोकणात सक्रिय झाला. दरम्यान, पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीवर ताशी 60 कि. मी. वेगाने वारे वाहतील. कोकणातील बहुतांश भागात मोसमी पाऊस आणखीन जोरदार सक्रिय होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे कोकणातील सर्व जिल्ह्यात 'मान्सून अलर्ट' जारी करताना मच्छीमारांनी मासेमीरसाठी जाऊ नये, असा इशारा प्रशासनांनी दिला आहे.

अरबी समुद्रातील बाष्पयुक्‍त वारे कमी दाबाच्या क्षेत्रात वेगाने येत आहेत. त्यामुळे कोकणा विभागासह पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. सध्यातरी संथ गतीने सक्रिय झाला असला तरी रविवारपासून मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. किनारपट्टीवर ताशी 60 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. दक्षिण किनारपट्टीवरही अशीच स्थिती असेल. उंच लाटा आणि खवळलेल्या समुद्रामुळे मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

जवळपास नैऋत्य मोसमी पाऊस दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले असले, तरी प्रत्यक्षात अनेक भागांत पाऊस होत नसल्याचे चिंता व्यक्त होत आहे. अशातच आता मोसमी पाऊस जोरदार सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. सध्या कोकण विभागात हलक्या पावसाला सुरुवात झाली असून, तीन दिवसांत त्याचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रातून सध्या बाष्पयुक्त वार्‍यांचा प्रवास वाढत आहे. दोन दिवसांत त्यांचा वेग वाढण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागात चक्रिय वार्‍यांची स्थिती तयार होत आहे. ही स्थिती लक्षात घेता पुढील दोन दिवसांत दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांत मुसळधारांची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आदी भागांतही मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. शनिवारी विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली. कोकण विभागातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. सकाळी मात्र काही भागातही हलका पाऊस झाला.

त्या नंतर त्याचा जोर पुन्हा वाढला पूर्व मोसमी पावसाच्या खंडानंतर मोसमी पाऊस सक्रीय झाला असला तरी अद्याप त्यामध्ये अपेक्षेप्रमाणे जोर नसल्याने खरीप पिकाच्या सिंचनाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, रविवारपासून त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. पावसाच्या समाधानकारक सक्रियते आधीच शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन विभगाने केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news