रत्नागिरी : 23 स्वातंत्र्यसेनानींचे आज होणार स्मरण

रत्नागिरी :  23 स्वातंत्र्यसेनानींचे आज होणार स्मरण
Published on
Updated on

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा :  चिपळूणमधील स्वातंत्र्य सैनिकांनी 7 सप्टेंबर 1942 रोजी मिरवणूक काढून सत्याग्रह केला होता. गांधी चौकात भाषणे झाली होती. त्या नंतर पोलिस आणि स्वातंत्र्यसैनिक यांच्यात संघर्ष झाला. या सत्याग्रहात 23 सत्याग्रही कारावासात गेले आणि त्यातील पाचजणांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली गेली.  न्यायालयात या सत्याग्रहींची बाजू तत्कालीन नामवंत वकील सोबळकर यांनी मांडली होती. न्यायालयाने दिलेल्या निकालपत्राची प्रत येथील लोटिस्मा वाचनालयाला उपलब्ध झाली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात क्रांतिदिनी (दि. 9) 1942चा या लढ्याचे स्मरण केले जाणार आहे.

स्वातंत्र्य मिळविण्यासाठी चिपळूण येथील सत्याग्रहात पोलिसांच्या लाठीहल्ल्याविरुद्ध झालेल्या हल्ल्यात दाखल झालेले आरोपपत्र (चार्जशीट) आणि त्यावरील रत्नागिरी येथील सेशन कोर्टाचा वाचनालयाकडे संग्रहित असलेला निकाल माजी अध्यक्ष कै. तात्या कोवळे यांनी मिळवला होता. हा खटला चिपळूण येथील मामलेदार लांबाते यांचेसमोर चालला होता. विशेष म्हणजे 1963 साली ज्यांनी काही दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषविले त्या कै. पी. के. सावंत यांचे वडील कृष्णाजी सावंत हे तेव्हा पोलिस हेडकॉन्स्टेबल होते.
या संघर्षात त्यांना व त्यांच्या समवेत असलेल्या पोलिसांना मारहाण झाली होती. रत्नागिरीचे सेशन जज्ज एन. एम. मियाभॉय यांनी 10 मे 1943 रोजी याबाबत निकाल दिला होता. तेवीस पैकी पंधरा जणांना मुक्त करण्यात आले होते. आठ जणांना शिक्षा झाली होती. या घटनेचा इतिहास नव्याने सर्वांसमोर येणार आहे.

1942चिपळूण' हे पुस्तक मराठी भाषांतर आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास सविस्तर साधनासाहित लिहिण्याचा दृष्टीकोन समोर ठेवून इतिहास अभ्यासक आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांनी हे पुस्तक समोर आणले आहे. मूळ इंग्रजी निकालपत्राचे भाषांतर शालन रानडे यांनी केले आहे. 'लोटिस्मा'ने हे पुस्तक देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या अपरान्तातील स्वातंत्र्यवीरांना अर्पण केले आहे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात 'अपरान्त'भूमीचे योगदान अमूल्य आहे. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधींचे राजकीय गुरु गोपाळ कृष्ण गोखले यांची जन्मभूमी रत्नागिरी जिल्हा आहे.

स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतलेल्या या तेवीस देशभक्‍तांच्या कुटुंबियांचा क्रांतीदिनी प्रतिकात्मक सन्मान होणार आहे. यावेळी आ. शेखर निकम, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर व मान्यवर उपस्थित राहाणार आहेत. याचवेळी कोकणातील दिनकरशास्त्री कानडे, केशवराव जोशी, मोहन धारिया आदी पाच ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांची तैलचित्रे कलादालनात लावण्यात येणार आहेत. चिपळूणच्या सत्याग्रहात कारावासात गेलेल्या तेवीस देशभक्त सत्याग्रहींच्या वंशजांनी, कुटुंबीयांनी 'लोटिस्मा'शी संपर्क साधावा. वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता उपस्थित राहून देशभक्तांना मानवंदना द्यावी, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष धनंजय चितळे, कार्यवाह विनायक ओक यांनी केले आहे.

हेच ते तेवीस स्वातंत्र्यसेनानी!
चिपळूणच्या सत्याग्रहात कारावासात गेलेल्या तेवीस सत्याग्रहींपैकी ज्ञानू बळवंत देशमुख, सीताराम भिकू कन्हाळ, गोपाळ लक्ष्मण लवेकर, नारायण रामचंद्र वेल्हाळ, रामकृष्ण महादेव गांधी, अनंत नारायण हटकर, सदाशिव विठ्ठल शेट्ये, रामकृष्ण सखाराम रेडिज यांना शिक्षा झाली होती. तर जनार्दन गोपाळ वेल्हाळ, महादेव गोपाळ कापडी, श्रीकृष्ण तुकाराम कोलगे, अनंत सीताराम कोलगे, सीताराम विष्णू आवले, परशुराम विष्णू आवले, गोपाळ नारायण राऊत, विठोबा शंकरशेठ टाकळे, सीताराम महादेव खातू, नथुराम त्र्यंबक वाडेकर, विठोबा पुंडलिक चौधरी, महादेव सीताराम जागुष्टे, भिकू गोपाळ विंचू, कृष्णाजी महादेव बापट, रघुनाथ गोविंद रेडिज यांची सुटका झाली होती. या 23 स्वातंत्र्यसेनानींच्या कुटुंबीयांचा क्रांतिदिनी सन्मान होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news