नारायण राणेंनी स्वतःच्या भविष्याची काळजी करावी : आ. वैभव नाईक

नारायण राणेंनी स्वतःच्या भविष्याची काळजी करावी : आ. वैभव नाईक

कुडाळ ; पुढारी वृत्‍तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या विधानाचा केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी विपर्यास केला. ना.राणे यांची भाजपात किंमत संपली आहे. त्यामुळे येणार्‍या काळात त्यांची अवस्था काय होईल, हे दिसेलच. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या राजकीय भवितव्याची काळजी करावी. तसेच शिवसेनेचे जे बंडखोर आमदार गुवाहाटीत गेले आहेत, त्यातील बरेच आमदार माझ्या संपर्कात आहेत. ते मुंबईत येतील तेव्हा आ.दीपक केसरकर यांच्यासह अनेक आमदारांचे परिवर्तन होऊन ते निश्‍चितच शिवसेनेसोबत येतील, असा ठाम विश्‍वास आ. वैभव नाईक यांनी कुडाळ येथे व्यक्‍त केला.

आ.वैभव नाईक यांचे शुक्रवारी कुडाळ येथे शिवसैनिकांनी जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर आ.नाईक यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, देशातील अनेक लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर झुकले. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यांच्यासमोर न झुकता आपल्या भूमिकेशी ठाम राहिले. गेल्या अडीज वर्षांत मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांनी चांगले काम केले. राज्यातील सर्वाधिक विकास निधी हा शिवसेनेच्या आमदारांना मिळाला आहे.

मात्र गेल्या काही दिवसांत ज्या राजकीय घडामोडी चालू आहेत. एकनाथ शिंदे अन्य आमदारांचे बंड नसून भाजपाचा त्यांच्यावर दबाव आहे. भाजपाने आमिषे देत, दबाव टाकून तसेच इडीच्या कारवाईची भिती त्यांना दाखवली आहे. जे आमदार शिवसेना सोडून गेले आहेत, त्यातील अनेक आमदार माझ्या संपर्कात असल्याचे सांगतानाच सत्ता असो वा नसो, आमदार असो वा नसो मी मात्र एकनिष्ठतेने शिवसेनेसोबत सदैव राहणार आहे, असे आ.नाईक म्हणाले.

त्यांनी गद्दारी केली : सतीश सावंत

कठीण काळात शिवसेनेचे निष्ठावंत आ.वैभव नाईक हे पक्षप्रमुख ठाकरे यांच्या पाठीशी राहीले. त्यांचे आम्ही स्वागत करतो. ज्यांना पक्षाच्या जीवावर ज्यांना मंत्रिपदे मिळाली, त्यांनीच आता इडीच्या कारवाईच्या भितीने शिवसेना पक्षाशी गद्दारी केली आहे. शिवसेनेला संकटे झेलण्याची सवय आहे. मात्र प्रत्येक संकटात शिवसेना उभी राहीली आहे. त्यामुळेच आताही पक्षप्रमुख ना. ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा एकदा डौलाने उभी राहील असा विश्‍वास सतीश सावंत यांनी व्यक्‍त केला.

गद्दारांचा शिवसेना निषेध करते : संदेश पारकर

जिल्ह्यातील सर्व सत्तास्थानांवर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे, हा विचार घेऊन आ.नाईक पक्षप्रमुखांच्या पाठीशी ठाम उभे राहिले आहेत. त्यामुळेच आता जिल्ह्यातील शिवसेनैनिकांनो जागे व्हा, सूडाने पेटून उठा, असे आवाहन पारकर यांनी केले.

आ.नाईक जनतेच्या मनातः अभय शिरसाट

राज्यात राजकीय सारीपाट गेले दोन- तीन दिवस सुरू आहे. शिवसेनेच्या काही आमदारांना भाजपाने ईडीची कारवाई तसेच विविध आमिषे दाखवली. त्यानंतर शिवसेनेचे बंडखोर आमदार सुरत, गुवाहाटीला गेले. मात्र आ.वैभव नाईक हे शिवसेना पक्ष आणि महाविकास आघाडीसोबत ठाम राहीले. त्यामुळे त्यांचे जनतेच्या मनात वेगळे स्थान निर्माण झाले असल्यचे राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभय शिरसाट यांनी सांगितले.

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते सतीश सावंत, संदेश पारकर, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, बबन शिंदे, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना जिल्हाप्रमुख तथा उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.जान्हवी सावंत, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, नगराध्यक्षा सौ.आफरीन करोल, विद्याप्रसाद बांदेकर, तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी,वर्षा कुडाळकर, अतुल बंगे, संतोष शिरसाट, विकास कुडाळकर, जयभारत पालव, रमाकांत ताम्हाणेकर, सुधीर राऊळ, सुशील चिंदरकर,सचिन काळप आदींसह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news