साडवली; पुढारी वृत्तसेवा : देवरुखनजीकच्या साडवली सह्याद्रीनगर येथील गौरीविहार कॉम्प्लेक्समधील बंद असलेले सहा बंगले चोरट्यांनी रविवारी रात्री फोडले आहेत. यामध्ये दोन बंगल्यातील मिळून 93 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे तर चार बंगल्यांमध्ये या चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. एकाच रात्री तब्बल सहा बंगले चोरट्यांनी फोडल्याने साडवलीसह देवरुख परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत देवरुख पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश महादेव लिंगायत यांच्या घरातून अडीच तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याच्या दोन बांगड्या व सहा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 73 हजार 500 रुपयांचा ऐवज तर अर्चना चंद्रकांत डोंगरे यांच्या घरातील 20 हजार रुपये किमतीचे चार ग्रॅमचे सोन्याचे ब्रेसलेट चोरट्यांनी लांबविले. याच कॉम्प्लेक्समधील आणखी चार बंगले फोडण्याचा या चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाती या बंगल्यातून काहीच लागले नाही. एकाच रात्री तब्बल सहा बंगले चोरट्यांनी फोडल्याची देवरुख पोलिसांना सोमवारी सकाळी माहिती मिळताच, पोलिस उपनिरीक्षक विद्या पाटील, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक डी. एस. पवार, हे. कॉ. प्रशांत मसुरकर, पो. कॉ. वैभव नटे, पो. कॉ. रोहित यादव यांनी पंचनामा केला. यामध्ये चार बंगल्यांमध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याचे म्हटले आहे, तर दोनबंगल्यांमधून एकूण 93 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे समोरआले आहे.
या चोरीचा छडा लावण्यासाठी देवरुख पोलिसांनी रत्नागिरीतून श्वानपथक, ठसेतज्ञ व फॉरेंन्सिक पथकाला पाचारण केले होते. याचवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी घटनास्थळी भेट देवून परिस्थितीची पाहणी केली आहे. या चोरीच्या घटनेची नोंद देवरुख पोलिस स्थानकात करण्यात आली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक विद्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देवरुख पोलिस करीत आहेत.