गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचे निधन

गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचे निधन
Published on
Updated on

कणकवली ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गझलकार, 9 व्या अखिल भारतीय गझल संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार, कवी मधुसूदन नानिवडेकर (61) यांचे हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने शनिवारी पहाटे 3 वा. तळेरे (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथे निधन झाले.

नवी मुंबई-वाशी येथे झालेल्या 9 व्या अखिल भारतीय गझल संमेलनाचे ते अध्यक्ष होते. रविवारी त्यांचे जन्मगाव नानिवडे (ता. वैभववाडी) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मधुसूदन नानिवडेकर यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रातील तारा निखळला आहे. प्रतिभावंत गझलकार, कवी हरपला आहे, अशा शब्दात विविध क्षेत्रांतून भावना व्यक्त होत आहेत.

मी कधी केली न माझ्या
वेदनांची रोषणाई
मी दिवाळी सोसण्याची
साजरी साधीच केली
घावही त्यांनीच केले
दंशही त्यांनीच केले
शेवटी श्रद्धांजलीची
भाषणे त्यांनीच केली

नानिवडेकर यांची चार दिवसांपूर्वीची शेवटची ही फेसबुक वरील पोस्ट आणि त्यातील 'श्रध्दांजली' हा शब्द वाचताना मनाला वेदना होतात.
मधुसूदन नानिवडेकर यांच्या अनेक गझला गझलनवाज भीमराव पांचाळे आपल्या कार्यक्रमातून सादर करतात. मधुसूदन नानिवडेकर यांच्या अनेक गझलांनी महाराष्ट्राला वेड लावले.

संपूर्ण राज्यभर त्यांनी गझल लेखनाच्या कार्यशाळा घेतल्या आहेत. 'चांदणे नदीपात्रात' या त्यांच्या गाजलेल्या कविता संग्रहाला साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले. पुणे विद्यापीठाने त्यांच्या या काव्य संग्रहाची निवड संदर्भ ग्रंथ म्हणून केली आहे.

1977 साला पासून त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली. त्यांनी लिहिलेली 'ठेव तु मनातल्या मनात' ही कविता ज्येष्ठ गझलकार सुरेश भटांच्या निदर्शनास आली आणि ते म्हणाले, अरे ही तर गझल आहे, तेव्हापासून ते गझल लेखनाकडे वळले. पुढे त्यांनी तेवढ्याच सशक्तपणे अनेक गझल लिहिल्या. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी गझल गायनाचे कार्यक्रम केले.

गझलविश्वात प्रतिष्ठेचा मानला गेलेला युआरएल फाऊंडेशचा 2019 चा 'गझल गौरव' पुरस्कार तसेच गझल लेखनातील कार्याबद्दल टिळक वाचन मंदिराचा 2020 मधील द्वारकानाथ शेंडे साहित्य पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. सिंधुदुर्गमधील दिवंगत साहित्यिकांचा परिचय करून देणार्‍या 'साहित्य सिंधू' या पुस्तकाचे संपादन त्यांनी केले होते.

नानिवडे गावचे 2012 ते 2015 या कालावधीमध्ये त्यांनी सरपंचपदही भुषविले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

मधुसूदन नानिवडेकर यांना शब्दरूपी श्रद्धांजली

व्यक्ती एक पण आविष्कार अनेकमधुसूदन नानिवडेकर ही एक व्यक्ती पण आविष्कार अनेक, उत्तम पत्रकार -अचूक व मोजकेच लिहिणारा, कवी -गझलकार – स्व. सुरेश भटांची 20 वर्षांची सोबत लाभल्याने गझल लेखनावर त्यांचे प्रभुत्व होते. कवी नारायण सुर्वे यांचे वैभववाडी तालुक्यातील हेत गावात स्मारक उभारण्यासाठी धडपडणारा एक साहित्यिक कार्यकर्ता, सिंधुदुर्गच्या साहित्यिक विश्वाची ओळख करुन देणारा एक अवलिया, सिंधुभूमी कला अकादमी सुरु करण्यामागचे प्रेरणास्थान, कविवर्य कै. विष्णु वाघ, कवी अरुण म्हात्रे, गझलकार भीमराव पांचाळे, रामदासजी फुटाणे, कविवर्य नायगांवकर यांच्या सोबत असलेला यांच्याशी मैफली रंगविणारा गझलकार, नानिवडे गावचा सरपंच म्हणून काम करणारा राजकारणी. अशी त्यांची विविध रूपे मी पाहिली. असा सज्जन माणूस पुढील 100 वर्षे होणे नाही.

प्रमोद जठार, माजी आमदार, कणकवली

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news